अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांचा निवडणुकांचा कार्यक्रम लांबला होता. आता करोना संसर्ग कमी झाल्याने

राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या वर्षभरात जिल्ह्यात मुदत संपलेल्या 2020 मधील संस्थांच्या निवडणूका घेण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने फेबु्रवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा बार उडणार आहे.

राज्य सरकारने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्यास परवानगी दिल्यानंतर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने स्वतंत्रपणे आदेश काढून सोमवार (दि.15) पासून निवडणूक कार्यक्रम आखण्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविले आहे. त्यानूसार जिल्हा उपनिबंधक कार्यालय जानेवारी ते मार्च 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीत मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम तयार करून तो प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठविणार आहेत. प्राधिकरणाकडून तात्काळ या निवडणूक कार्यक्रमाला मान्यता मिळाल्यानंतर या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापासून सहकारी संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. यात नगर शहरातील मर्चंट बँक, शहर सहकारी बँकेसह जिल्ह्यातील साखर कारखाने, सेवा सोसायट्या, पतसंस्था, मजूर संस्था आणि अन्य सहकारी संस्थांचा समावेश आहे. जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या ब वर्गातील 888 संस्था, क वर्गातील 551 आणि ड वर्गातील 246 संस्थांचा समावेश आहे. या सर्व संस्थांच्या निवडणूक सहा टप्प्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालय चालू वर्षात पूर्ण करणार आहे. यानंतर पुढील वर्षी 2022 मध्ये 2021 मध्ये मुदत संपलेल्या बँका आणि इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक घेण्यात येणार आहेत. यामुळे चालू वर्ष आणि पुढील वर्षे हे जिल्हा उपनिबंधक कार्यालयासाठी निवडणूक कार्यक्रम घेण्यात व्यस्त राहणार आहे. फेबु्रवारी 2021 मध्ये प्राथमिक शिक्षकांचा जिव्हाळ्या विषय असणार्या प्राथमिक सहकारी बँकेची मुदत संपणार आहे. या बँकेचा निवडणूक कार्यक्रम वर्षभरासाठी पुढे जाण्याची शक्यता सहकारातील जाणकारांनी व्यक्त केली.

करोनामुळे मार्च 2020 मध्ये अंतिम प्रारूप यादी झालेल्या मात्र, मध्येच निवडणूका प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या जिल्ह्यातील 156 विकास सोसायट्या असून क वर्गातील 113 संस्था आाणि ड वर्गातील 46 संस्थांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा समावेश असून या संस्थेच्या निवडणुकीकडे जिल्हा परिषद कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.