निवडणुकीवरून कुरुंदमध्ये पिस्तुलांसह तलवार व काठ्यांनी हल्ला

11 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक, इतर पसार
निवडणुकीवरून कुरुंदमध्ये पिस्तुलांसह तलवार व काठ्यांनी हल्ला

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

माजी सरपंच अनिल कर्डिले यांच्याविरोधात निवडणूक लढविल्याने त्याचा राग मनात धरून तलवारींसह पिस्तुल व काठ्यांनी हल्ला करून

जयवंत मंजाबा नरवडे (वय 55 रा. कुरूंद) यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुरूंदचे माजी सरपंच अनिल कर्डिले तसेच त्यांचा पुतण्या अमोल भाऊसाहेब कर्डिले यांच्यासह 11 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना मंगळवारी रात्रीच अटक करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी दिली.

नुकतीच पार पडलेल्या कुरूंद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच अनिल कर्डिले यांच्या विरोधात जयवंत मंजाबा नरवडे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत अनिल कर्डिले विजयी झाले. तर जयवंत नरवडे हे पराभूत झाले. विरोधात निवडणूक लढविल्याचा राग अनिल कर्डिले तसेच अमोल कर्डिले यांच्या मनामध्ये होता.

निवडणूक निकालानंतर गावामध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान अमोल कर्डिले व त्याच्या समर्थकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. निकालाच्या दुसर्‍या दिवशी (मंगळवारी) अनिल कर्डिलेे व त्यांचा पुतण्या अमोल कर्डिले यांनी सागर भाऊसाहेब कर्डिलेे, विवेक अरुण कर्डिलेे, अविनाश निलेश कर्डिलेे, राजू शेळके, राजेंद्र साहेबराव कर्डिलेे, पंकज अनिल कर्डिलेे, सुहास थोरात, आकाश निलेश कर्डिलेे, रमेश महादू नरवडे यांना सोबत घेऊन प्रतिस्पर्धी जयवंत नरवडे यांच्या वस्तीवर गेले.

नरवडे यांना घरातून बाहेर ओढीत आणून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. तलवारीने वार करून काठ्यांनीही मारहाण करण्यात आली. अचानक हल्ला झाल्याने नरवडे यांच्या घरातील त्यांची सून तसेच दोन मुली भयभीत झाल्या. नरवडे यांची सून मध्यस्ती करण्यासाठी गेली असता अविनाश निलेश कर्डिलेे याने कमरेला लावलेले पिस्तुल डोक्यास लावून गोळ्या घालण्याची धमकी दिली. मोठ्या प्रमाणावर वार झाल्यानंतर नरवडे हे घरासमोर पडले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

जखमी नरवडे यांना तातडीने (शिरूर जि. पुणे) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजल्यानंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिरूर येथील खाजगी रुग्णालयात जयवंत नरवडे यांचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतर अनिल दशरथ कर्डिले, अमोल भाऊसाहेब कर्डिले, सागर भाऊसाहेब कर्डिले, विवेक अरुण कर्डिले, अविनाश निलेश कर्डिले, राजू शेळके, राजेंद्र साहेबराव कर्डिले, पंकज अनिल कर्डिलेे, सुहास थोरात, आकाश निलेश कर्डिले, रमेश महादू नरवडे (सर्व रा. कुरूंद ता. पारनेर) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, घातक हत्त्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे, बेकायदेशीर जमावाचा घटक असणे, दंगा करणे, बेकायदा शस्त्र वापरणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आकाश निलेश कर्डिले व रमेश महादू नरवडे यांना मंगळवारी रात्रीच पारनेर पोलिसांनी अटक केली. उर्वरीत आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती सोनवणे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी कुरूंद येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com