ज्या स्थितीला निवडणुका थांबल्या आहेत तेथून पुढे घेण्याचे आदेश

नगर जिल्ह्यातील विविध संस्थांची निवडणूक रणधुमाळी पुन्हा सुरू होणार
ज्या स्थितीला निवडणुका थांबल्या आहेत तेथून पुढे घेण्याचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य निवडणूक आयोग व राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या थांबवलेल्या निवडणुका तात्काळ घेण्याचे निर्देश देऊन 16 डिसेंबर 2022 रोजी नवीन निवडणूक कार्यक्रम ज्या स्थितीला निवडणुका थांबल्या आहेत तेथून पुढे घेण्याचे निर्देश दिले आहेत, या निर्णयामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील स्थगित झालेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण देत शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली. अमृत सागर दूध संघाच्या निवडणुकीची सुरुवात झालेली असताना सदरचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या निवडणूक कार्यक्रमादरम्यान राज्य शासनाने दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या स्थगित केल्या होत्या.

सदर निर्णयास उच्च न्यायालयात रीट याचिका क्रमांक 12211/2022 ही मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ व इतर यांच्यावतीने दाखल करण्यात आली. सदरची याचिका ही, दनांक 9 डिसेंबर 2022 रोजी सूनावनीला निघाली असता, याचिका करते यांचे वकील अ‍ॅड.अजित बबनराव काळे यांनी उच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, सदरचा आदेश देत असताना राज्य शासनाने सरसकट कोणतेही संयुक्तिक कारण न देता निवडणुकांना स्थगिती दिलेली आहे. तसेच राज्यांमध्ये जवळपास दोन वर्षापासून सातत्याने निवडणुका या पुढे ढकलल्या जात आहेत.

तसेच कलम 73 क क मध्ये असलेले राज्य शासनाचे अधिकार गैरप्रकाराने वापरले जात असून ठराविक संस्थांना याच्यातून वगळण्यात आले आहे. या युक्तीवादाच्या पृष्टीसाठी जळगाव जिल्हा दूध संघ या संस्थेची निवडणूक देखील स्थगित करण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने 2 डिसेंबर 2022 रोजी त्या दूध संघाची निवडणूक घेण्याचे निर्देश जारी केले व त्या दूध संघास 29 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या स्थगितीमधून वगळण्यात आले. राज्य शासन ठराविक संस्थेच्या बाबतीत वेगळी भूमिका आणि इतर संस्थांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत असल्याचे श्री काळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कोर्टाने सदर बाबतीत राज्य शासनाच्या वकिलांना शपथपत्र दाखल करण्याचा आदेश केला होता.

सदर प्रकरण हे दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी सुनावणीला ठेवले असता राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयास शपथपत्राद्वारे जळगाव दूध संघाच्या संदर्भात स्थानिक आमदारांनी मागणी केल्यामुळे व ग्रामपंचायतच्या मतदानाचा दिवस व दूध संघाच्या मतदानाचा दिवस हा वेगळा असल्यामुळे शासनाने त्या दूध संघास स्थगिती आदेशातून वगळले. सुनावणी दरम्यान राज्य शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न आल्यामुळे व जळगाव जिल्हा दूध संघाच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्यामुळे उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून शासनाचा तो निर्णय मनमानी स्वरूपाचा असल्याचे मत व्यक्त केले व राज्य निवडणूक आयोग व राज्य शासन यांना राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या थांबवलेल्या निवडणुका तात्काळ घेण्याचे निर्देश देऊन 16 डिसेंबर 2022 रोजी नवीन निवडणूक कार्यक्रम ज्या स्थितीला निवडणुका थांबल्या आहेत तेथून पुढे घेण्याचे निर्देश दिले आहे.

सदर याचिकेमध्ये याचिकाकर्ते धुमाळ व इतर यांच्यावतीने अंड. अजित काळे, अ‍ॅड. अनिकेत चौधरी व एडवोकेट साक्षी काळे यांनी काम पाहिले तर सरकारच्या वतीने अ‍ॅड. ज्ञानेश्वर काळे व राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. कदम यांनी काम पाहिले.

नगर जिल्ह्यातील विविध संस्थांची निवडणूक रणधुमाळी पुन्हा सुरू होणार

- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर आज दि.16 डिसेंबर पासून जिल्ह्यातील 21 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होणार्‍या सहकारी संस्थांमध्ये नगर शहर सहकारी बँकेच्या 13 जागा, नगर मर्चंट बँक, रुक्मिणी बँक श्रीगोंदा, स्वामी समर्थ बँक पारनेर, कोपरगाव पीपल्स बँक, छत्रपती ग्रामसेवक पतसंस्था, नगर मजूर फेडरेशन यासह 21 छोट्या-मोठ्या संस्थांचा समावेश आहे.

- दरम्यान, नगर शहर बँकेच्या 13 जागांसाठी चिन्ह वाटप होऊन मतदान प्रक्रिया होणार आहे. बँकेच्या 15 संचालकांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, यातील बिनविरोध झालेल्या संचालकांचे निधन झालेले आहे. यामुळे आता या संचालकांच्या जागेवर पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवणार की 13 संचालकांच्या जागेसाठी मतदान प्रक्रिया होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यासाठी जाणकारांनी सहकार निवडणूक नियम 27 आणि 31 चा आधार घेत जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज दिलेला आहे. त्यावर ते काय निर्णय घेतात यावर शहर बँकेच्या एका जागेच्या निवडणुकीचे भविष्य ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com