निवडणुका लांबल्याने राजकीय नेत्यांचा खर्च वाढला

निवडणुका लांबल्याने राजकीय नेत्यांचा खर्च वाढला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shirdi

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सध्याच्या सण उत्सवाच्या काळात कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कधी एकदा निवडणुका होतात व होणार्‍या खर्चातून वाचतो, अशी अवस्था राजकीय नेत्यांची झाली आहे.

आघाडी सरकारच्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. नगरपालिकेसाठी एकत्र निवडणूक होणार होती. त्यासाठीचे प्रभाग रचना, गट व गणांची रचना, मतदार याद्या, त्यावरील हरकती, प्रभागासह गट व गणांचे आरक्षण तसेच तत्सम बाबींची पूर्तता झाली होती. त्यावर आक्षेप आल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतरच्या शिंदे-फडणवीस सरकारने नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. एकुणच काय तर या ना त्या कारणाने निवडणुका लांबणीवर पडत आहेत.

निवडणुका म्हटले की कार्यकर्ते सांभाळणे आलेच. किमान निवडणूक होईपर्यंत त्यांच्या पुढे पुढे करणे आलेच. निवडणुका लांबल्याने राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांसाठी खर्च करावा लागत आहे. दिवसेंदिवस त्याचा फटका राजकीय नेत्यांना बसत आहे. गेल्या महिन्यात दहिहंडीचा कार्यक्रम झाला. त्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची चढाओढ पहायला मिळाली. या उत्सवावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. अर्थातच या खर्चाचा फटका राजकीय नेत्यांनाच बसला.

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. अनेक मंडळांनी गणेश स्थापना केली आहे. त्यासाठी वर्गणी रुपाने पैसे गोळा करण्यात आले आहेत. काही मंडळांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या वर्गणीतून राजकीय नेतेही सुटलेले नाहीत. त्यांनीही यासाठी मोठी रक्कम दिली आहे. पुढे नवरात्र उत्सव येऊ घातला आहे. गणेशोत्सवापेक्षा नवरात्र उत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यावेळी मोठमोठे देखावे, विद्युत रोषणाई असते. त्यावर लाखोंचा खर्च होतो. काही मंडळांनी या उत्सवासाठीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. या उत्सवासाठीही राजकीय नेत्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

कार्यकर्ते आपलेच आहेत, त्यांना सांभाळणे ओघाने आलेच. परंतु अशा प्रकारे त्यांच्यासाठी मोठा खर्च होत असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. कार्यकर्त्यांवरील खर्च वाढला आहे. लांबणीवर पडलेल्या निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. कधी जाहीर होतील ते सांगता येत नाही. परंतु खर्च मात्र वाढत आहे. त्यामुळे कधी एकदाच्या निवडणुका होतात व होणार्‍या खर्चातून वाचतो, अशी अवस्था राजकीय नेत्यांची झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com