जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा लवकरच बिगूल !

सहकार विभागाने शिक्षक सभासदांची यादी मागवली
जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा लवकरच बिगूल !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार आहे. जिल्हा उपनिबंधक विभागाने बँकेकडून सभासदांच्या प्रारूप याद्या मागवल्या असून या यादीची तपासणी झाल्यावर सहकार विभाग शिक्षक बँकेची प्रारूप यादी प्रसिध्द करून त्यावर हरकती आणि सुनावणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. यामुळे निवडणुकीकडे वर्षभरापासून डोळे लागलेल्या शिक्षक संघटना आणि निवडणुकीसाठी इच्छूक असणार्‍यांची प्रतिक्षा संपणार आहे.

नगर जिल्हा शिक्षक बँकेची मुदत फेबु्रवारी 2021 मध्येच संपली होती. मात्र, कोविडमुळे साधारणपणे एक ते सव्वा वर्षे बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याची वेळ आली होती. दरम्यान, सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाने मागील सर्वसाधारण सभेत बँकेची निवडणुक तातडीने घेण्याचा ठराव घेतला होता. तर काही शिक्षक संघटनांनी बँकेची निवडणूक व्हावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. जिल्ह्यात कोविडमुळे हजारो सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकल्या होत्या. यात विविध कार्यकारी सोसायटी आणि अन्य सहकारी संस्थांचा समावेश होता. यात शिक्षक बँकेचा समावेश होता. आता कोविडचा प्रार्दूभाव कमी झाला असून सहकारी संस्थांच्या निवडणूका संपत आल्या आहेत. यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी बँकेच्या सभासद असणार्‍या प्राथमिक शिक्षकांची प्रारूप यादी मागवली आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत एकूण 10 हजार 545 शिक्षक सभासद असून यातून 10 हजार 502 शिक्षक सभासद पात्र मतदार आहेत. 43 शिक्षक सभासद हे मयत, परागंदा, थकबाकीदार अथवा आंतरजिल्हा बदलीने बदलून गेलेले आहेत. यातील थकबाकीदार शिक्षक सभासदांनी थकबाकी भरल्यास मतदानाला पात्र ठरणार आहे. सहकार विभागाला बँक प्रशासनाने सादर केलेल्या प्रारूप मतदार यादीत 10 हजार 502 सभासदांची नावे देण्यात आली असून सहकार विभाग त्याची पडताळणी करून ती प्रारूप यादी प्रसिध्द करणार आहेत. ही प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यावर त्यावर 25 दिवसांत हरकती घेवून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो असा संकेत असल्याने लवकरच शिक्षक बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

मागील निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी सदिच्छा मंडळाचा पराभव करून गुरूमाऊली मंडळ सत्तेत आले. या मंडळाच्या काळात एक सर्वसाधारण सभा सोडली तर अन्य सभा मागील पंचवार्षिकच्या तुलनेत शांततेत झालेल्या आहेत. एका सर्वसाधारण सभेत डीसीपीएस धारक शिक्षकांवर सभेत गोंधळ घातल्याने गुन्हे दाखल झाले होते. शिक्षक बॅकेचा वार्षिक उलाढाल 2 हजार 600 कोटीहून अधिक असून या बँकेवर सत्ता राखण्यासाठी शिक्षक मंडळ आणि संघटनामध्ये मोठी चुरस राहणार आहे.

यामुळे राज्याच्या नेत्यांचा बँकेवर डोळा

बँकेच्या सहा वर्षापूर्वी म्हणजेच 28 फेब्रुवारीला झालेल्या निवडवणुकीत विद्यमान सत्ताधारी गुरूमाऊली, गुरूकुल आणि बहुजन मंडळ तसेच सदिच्छा मंडळ अशी तिरंगी लढत झाली होती. यंदा गुरूमाऊली मंडळात दोन गट असून यामुळे कोणाची कोणासोबत कशी युती होणार याकडे पाहणे गरजेचे राहणार आहे. गुरूजींच्या संघटनांचा शिक्षक बँके नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला असल्याने राज्य पातळीवरील नेत्यांचा देखील नगरच्या शिक्षक बँकेत जीव गुंतलेला असल्याचे जिल्ह्यातील शिक्षकांनी पाहिलेले आणि अनुभवलेले आहे.

Related Stories

No stories found.