दिवाळीनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बार

जिल्ह्यातील 12 समित्या निवडणुकीसाठी पात्र
दिवाळीनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बार

अहमदनगर (प्रतिनिधी)

कोविडमुळे लांबलेल्या राज्यातील मुदत संपलेल्या बाजार समित्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या सहकार आणि पणन खात्याने काढले असून 23 ऑक्टोबरनंतर बाजार समित्याच्या निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. नगर जिल्ह्यात 14 बाजार समित्यापैकी 12 बाजार समित्यांची मुदत संपलेली असून त्या निवडणुकीस पात्र आहेत. दिवाळी झाल्यानंतर या बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.

राज्याच्या सरकारच्या सहकार खात्याने 24 एप्रिल 2021 ला राज्यात कोविडचा प्रभाव वाढल्याने मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणूका या 23 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकल्या होत्या. राज्य सरकारला नैसर्गिक आपत्तीत एक वर्षे निवडणूका पुढ ढकल्याचे अधिकार असून त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका या 23 ऑक्टोबरपर्यंत पुढ ढकल्या होत्या. मात्र, आता कोविडचा प्रभाव कमी झाला असल्याने मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक हे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असून निवडणूक कार्यक्रम लावण्यापूर्वी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करून त्यावर हरकती घेवून मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. मतदार यादी अंतिम केल्यानंतर बाजार समितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक केल्यानंतर त्यात्या बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नगर आणि पारनेर वगळता सर्व बाजार समित्याचा निवडणूक कार्यक्रम दिवाळीनंतर लागू होणार आहे.

अशी तयार होणार मतदार यादी

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करतांना सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची नावे संंबंधीत तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांच्याकडून घेण्यात येणार आहेत. तर विविध विकास सोसायटीचे संचालक यांची नावे तालुका उपनिबंधक यांच्याकडून घेण्यात येणार आहेत. हमाल आणि व्यापारी मतदारांची नावे बाजार समिती प्रशासनाकडून घेण्यात येणार असून त्यानूसार मतदार यादीत त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करून त्यावर हरकती घेवून त्या निकाली काढल्यावर संबंधीत बाजार समितीची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

नगर आणि पारनेर बाजार समितीची मुदत देखील नोव्हेेंबर आणि डिसेंबरमध्ये संपणार आहे. यामुळे त्यानंतर पुढील तीन महिन्यांत या दोन्ही बाजार समितीची निवडणूक होणार आहेत. या दोन्ही बाजार समित्या महत्वाच्या असून यामुळे जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत या दोन निवडणुका चांगल्याच गाजणार आहेत. सध्या पारनेरची बाजार समिती ही राष्ट्रवादीच्या ताब्या असून नगरची बाजार समिती ही भाजपच्या ताब्यात आहे.

Related Stories

No stories found.