निवडणूक येता दारी, उमेदवार येई घरी, इतके वर्ष कुठे होता? विचारी जनता सारी

जागृत नागरिकांचा फ्लेक्स चर्चेचा विषय
निवडणूक येता दारी, उमेदवार येई घरी, इतके वर्ष कुठे होता? विचारी जनता सारी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

‘निवडणूक येता दारी, उमेदवार येई घरी, इतके वर्ष कुठे होता, विचारी जनता सारी’ अशा आशयाचा शहरात लावण्यात आलेला फ्लेक्स सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. पाच वर्षांच्या कारकिर्दीत प्रभागातील फारसे कामे न करणार्‍या मात्र पुन्हा निवडणूक लढवू इच्छिणार्‍या नगरसेवकांबाबत हा फलक असल्याने कामचुकार नगरसेवकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

संगमनेर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संगमनेर नगरपालिकेच्या मावळत्या नगरसेवकांची मुदत संपून वर्षाचा कालावधी उलटलेला आहे मात्र वेगवेगळ्या कारणामुळे नगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. राज्यातील सत्तांतरानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच घेण्यात येतील असे चित्र तयार झाले आहे.

यामुळे इच्छुक उमेदवार चांगलेच कामाला लागलेले आहे. इच्छुक उमेदवार मध्ये काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. संगमनेर शहरातील अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांकडे फारसे लक्ष दिले नाही. मोजक्याच नगरसेवकांनी सातत्याने आपल्या प्रभागातील विकास कामांकडे लक्ष दिले. यातील अनेक जण पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

नगरपालिका निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने काही नगरसेवकांनी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. पाच वर्ष विकास कामांकडे दुर्लक्ष करणारे आता पुन्हा दिसू लागल्याने काही प्रभागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

काम न करणार्‍या एका नगरसेवकाला उद्देशून शहरातील अकोले बायपास परिसरात एक फ्लेक्स बोर्ड झळकत आहे. येत्या निवडणुकीत आमच्याकडे लक्ष असू द्या असे हा नगरसेवक म्हणत असून गेली पाच वर्षे आपले दर्शन झाली नाही. कोठे होतात आपण अशी विचारणा या फ्लेक्स मध्ये उमेदवाराला करण्यात आली आहे. हा फ्लेक्स बोर्ड सध्या संगमनेर शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com