अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप, नागवडे सक्रिय

तालुक्यात विविध कार्यक्रमांतून संपर्क अभियान
अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप, नागवडे सक्रिय

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप सक्रिय झाले असून तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे सढळ हाताने आयोजन करून संपर्क अभियान राबवताना दिसत आहेत.

श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण ठराविक तीन चार नेत्यांच्या भोवती फिरत असते. तालुका तसा कायम राजकीय दृष्टीने संवेदनशील असल्याने तालुक्याच्या राजकारणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. अडीच वर्षांनंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वी आत्ता तोंडावर आलेल्या मिनी मंत्रालय म्हटले जाणार्‍या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आता रणधुमाळी सुरू होत आहे.

याची तयारी म्हणून माजी आमदार राहुल जगताप यांनी तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे स्व. कुंडलिकराव तात्या जगताप यांच्या जयंतीनिमित्त व रेणुका देवी यात्रेनिमित्त 16 मे रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. तसेच यात राज्यभरातील गाडा मालकांना आकर्षीत करण्यासाठी लाखो रूपयांच्या बक्षिसांची खैरात केली आहे. या शर्यतीेची जय्यद तयारी सुरू असून यासाठी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील मंत्री, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

दुसरीकडे अशीच तयारी श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सुरू केली आहे. राज्यासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या चला हवा येऊ द्या या लोकप्रिय टी.व्ही कार्यक्रमाचा प्रत्यक्ष सोहळा अनुभवण्याची संधी श्रीगोंदावासियांना मिळणार आहे. यासाठी राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधले असून त्यांच्याच मित्रपरिवाराच्या पुढाकारातून 18 मेला हा कार्यक्रम पार पडणार आहे.

राजेंद्र नागवडे यांचे स्वप्न आमदार होण्याचे असले तरी यापूर्वी मिनी मंत्रालयाच्या निवडणूकीत आपला करिष्मा दाखवण्यासाठी नागवडे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यात माजी आमदार राहुल जगताप हे देखील मागे राहणार नसल्याने त्यांनी आपली कारखाना बिनविरोध करत जिल्हा बँकेते देखील आपले राजकीय वजन वाढवले असून त्यांनी पुढच्या निवडणुकीसाठी आपला दावा पक्का करण्यास सुरूवात केली आहे. प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार हे देखील तालुक्यात संपर्क ठेऊन असताना माजी मंत्री बबनराव पाचपुते याच्या गटात अजून जरी शांतता असली तरी त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीपूर्वी सक्रिय होतील.बाकी दुसर्‍या फळीतील इच्छुकांनी तयारी सुरू केली असली तरी त्यांना पहिल्या फळीतील नागवडे ,जगताप ,पाचपुते यांच्या आधाराने राजकीय पावले टाकावी लागणार आहेत.

लग्न, दहाव्यांना राकीय गर्दी

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांमध्ये अनेकजन इच्छुक आहेत. त्याची तयारी म्हणुन सर्व इच्छुक सध्या लग्नकार्य, अंत्यविधी, दशक्रिीया विधी यासह अगदी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. यामुळे नागरीकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.