धक्कादायक ! घराच्या छतावर वृध्द दाम्पत्याचे मृतदेह आढळले

दरोडा की घातपात चर्चेला उधाण
धक्कादायक ! घराच्या छतावर वृध्द दाम्पत्याचे मृतदेह आढळले

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारातील भुजाडे वस्तीवर राहत्या घराच्या छतावर वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला आहे. सदर दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. घरातील कपाट उघडे तर सामानाची उचकपाचक केलेली असल्याने या ठिकाणी दरोडा की आणखी काही याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दत्तात्रय गंगाधर भुजाडे अंदाजे (वय 75) व पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65) असे मयत पती पत्नीचे नाव आहे.

दत्तात्रय गंगाधर भुजाडे व त्यांची पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे हे दोघेच आपेगाव शिवारात आपल्या शेतात राहत होते. त्यांना दोन विवाहित मुले असून ते कामानिमित्त पुणे येथे राहतात. सोमवार दि. 30 मे रोजी सायंकाळी हे दोघे पती-पत्नी तळेगाव येथे सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यांनतर त्यांच्या मुलाने नेहमीप्रमाणे फोन केले असता ते उचलत नसल्याने मुलाने काल बुधवार दि. 1 जून रोजी त्यांच्या चुलत भावाला फोन करून चौकशी करण्यास सांगितल.

चुलत भाऊ आपल्या जोडीदारासोबत वस्तीवर गेला असता त्या ठिकाणी घराचे दरवाजे बंद होते. त्यांनी घरा शेजारी असलेल्या विद्युत पोलवर चढून पाहिले असता घराच्या छतावर ते दोघे अंथरुणावर मयत अवस्थेत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी तात्काळ सदर घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील, गावकरी व पोलिसांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अप्पर पो. अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पो. नि. दौलत जाधव, सहाय्यक पो.नि. सुभाष आव्हाड यांनी पंचनामा करून सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

दरम्यान उन्हाळ्याचे दिवस असल्याने स्लॅबच्या घरात गरम होत असल्याने हे दाम्पत्य स्लॅब वर झोपलेले होते. घराचे दरवाजे हे आतूनच बंद होते. आरोपींनी घराच्या छतावरच्या दरवाजाने आत प्रवेश करून घरामधील सामानाची उचका पाचक केलेली होती. त्यामुळे सदर घटना प्रथमदर्शनी दरोड्याची दिसत असली तरी या दाम्पत्याचा खून कोणत्या कारणाने झाला याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com