शिर्डी : साईमंदिरात वयोवृद्ध व गर्भवती महिलांना दर्शन मिळणार, पण...

शिर्डी : साईमंदिरात वयोवृद्ध व गर्भवती महिलांना दर्शन मिळणार, पण...

शिर्डी | शहर प्रतिनिधी

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिर्डी येथील साईमंदीरात गर्भवती महिला व ६५ वर्षे वयोगटापुढील भाविकांना दर्शनासाठी करण्यात आलेली प्रवेश बंदी उठवण्यात आली असून कोव्हीड लसिकरणाचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच साईसमाधीचे दर्शनासाठी प्रवेश मिळेल अशी माहिती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. यामध्ये जास्तीत जास्त संख्या ६५ वर्षापुढील भाविकांची असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील दोन वर्षापासून करोनाचा वाढता प्रादुर्भाव याकारणास्तव राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद केली होती. करोनाची पहिली लाट ओसरताच दि.१९ नोव्हेंबर २०२० रोजी श्री साईमंदीराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर चार महिन्यातच करोनाची दुसरी लाट उसळली आणी पुन्हा दुस-यांदा संस्थानच्या इतिहासात ५ एप्रिल २०२१ रोजी साईमंदीराचे दरवाजे बंद करण्यात आले.

केंद्र सरकारने करोनाचे लसिकरण जास्तीत जास्त वेगाने व्हावे यासाठी लसिकरणाची संख्या वाढवून देत लसिकरण मुक्त भारत या दिशेने वाटचाल सुरू करून शंभर कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे करोनापासून मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. एकंदरीतच करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने घटस्थापनेला राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी खूली करून दिली होती. परंतु यामध्ये ६५ वर्षे वयोगटापुढील तसेच १० वर्षाच्या आतील लहान मुलांना आणी गर्भवती महिला भाविकांना साईमंदीरात दर्शनासाठी प्रवेश बंदी घालण्यात आली होती.

मात्र सदरची प्रवेश बंदी उठविण्यात आली असली तरी देखील १० वर्षाच्या आतील लहान मुलांना साईमंदीरात दर्शनासाठी अद्यापही प्रवेश बंदी असल्याचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता वयोवृद्ध भाविकांना तसेच गर्भवती महिलांना साईमंदीरात साईसमाधीचे दर्शन घेता येणार आहे. साईसंस्थानचे या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com