एकरुखेत दोन कुटुंबात हाणामारी

परस्परविरोधी फिर्याद दाखल; एकास अटक
एकरुखेत दोन कुटुंबात हाणामारी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

शेतात गवत का टाकले म्हणून आणि बांध कोरला या कारणावरून तालुक्यातील एकरुखे येथील दोन कुटुंबात हाणामारी झाली. या हाणामारीत एक महिला जखमी झाल्याने तिला शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी एकास अटक केली आहे.

नारायण बाबुराव मदने रा. एकरुखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण तसेच पत्नी चंद्रकला, मुलगा कृष्णा व सून अश्विनी असे घरात असताना अशोक बाबुराव मदने, सुनीता अशोक मदने दोघे राहणार एकरुखे व अशोकचा मेव्हुणा अशोक दगु ठोंबरे रा. सावखेडगंगा ता. वैजापूर यांनी घरात येऊन तू माझ्या शेतात गवत का फेकले असे विचारल्यावरून फिर्यादी म्हणाला, तुझी बायको सुनीता हिने बांधावरील गवत खरडून काढून ते माझ्या वावरात कशाला फेकले. त्यामुळे मी ते परत तुझ्या वावरात टाकले असे आपण म्हणाल्याचा राग येऊन यातील अशोक बाबुराव मदने याने त्याच्या हातातील फावडे घेऊन नारायण मदने यांच्यावर धाऊन आला व नारायण यास म्हणाला, थांब आता तुझ्याकडे पाहतो, असे म्हणून नारायण मदने यांच्यावर फावडे उगारले.

त्यावेळी नारायण मदने यांची पत्नी चंद्रकला ही वाचवण्यासाठी मध्ये आली असता तिच्या डोक्यात अशोक मदने याने लोखंडी फावड्याने मारून तीस गंभीर जखमी केले. मारामारीत फिर्यादीचा मुलगा कृष्णा सोडवासोडवी करत असताना अशोक बाबुराव मदने, सुनीता अशोक मदने, अशोकचा मेव्हुणा अशोक दगु ठोंबरे यांनी शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुमच्याकडे पाहू अशी धमकी दिली. नारायण बाबुराव मदने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी अशोक बाबुराव मदने, भावजयी सुनीता अशोक मदने, अशोक दगु ठोंबरे यांचे विरुध्द गुन्हा रजि. नंबर 300/2022 प्रमाणे भादंवि कलम 326, 452, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या हाणामारीच्या घटनेत चंद्रकला नारायण मदने (वय 40) ही महिला जखमी झाल्याने तीला शिर्डी रुग्णालयात दाखल केले आहे. यात अशोक दगू ठोंबरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बाबा सांगळे करत आहेत.

दुसरी फिर्याद अशोक बाबुराव मदने रा. एकरुखे यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे, अशोक मदने व नारायण मदने यांच्या सामाईक बांधावरून शेतात चारा आणण्यासाठी जात असताना नारायण बाबुराव मदने, चंद्रकला बाबुराव मदने, किसन नारायण मदने, अश्विनी किसन मदने सर्व रा. एकरुखे हे तेथे आले व फिर्यादी अशोक बाबुराव मदने यांना म्हणाले, तू आमचा बांध कोरतो काय, त्यावर फिर्यादी म्हणाला, मी कशाला बांध कोरू असे म्हणाल्याचा राग आल्याने नारायण बाबुराव मदने याने अशोक मदने यास दगड फेकून मारून जखमी केले.

तसेच सर्वांनी मिळून शिवीगाळ करून फिर्यादीची पत्नी सुनीता भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला व अशोक मदने यांना नारायण मदने यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी नारायण बाबुराव मदने, चंद्रकला नारायण मदने, किसन नारायण मदने, अश्विनी किसन मदने सर्व रा. एकरुखे यांच्याविरुध्द गुन्हा रजि. नंबर 299/2022 नुसार भादंवि कलम 337, 324, 323, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com