एकलहरे-टिळकनगर शिवरस्त्यासंदर्भात तहसीलदार पाटील यांचे आश्वासन

एकलहरे-टिळकनगर शिवरस्त्यासंदर्भात तहसीलदार पाटील यांचे आश्वासन

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

एकलहरे-टिळकनगर शिवरस्त्यासंदर्भात शिर्डी विभागाचे उपविभागीय प्रांताधिकारी यांच्या सत 2021 च्या पत्रानुसार एकलहरे, रांजणखोल, उक्कलगाव, खंडाळा ग्रामपंचायतीसह डहाणूकर उद्योग समूहाने कारखाना लगत असलेल्या गटांचे सात बारा उतारे, आठ अ, फेरफार व नकाशे भूमी अभिलेखला देऊन ग्रामपंचायत व टिळकनगर कारखाना यांनी भूमी अभिलेखद्वारे संयुक्तरित्या मोजणीच्या प्रक्रियेनंतर तात्काळ शिवरस्ता खुला करण्यात येईल, तर तत्पूर्वी टिळकनगर एकलहरे रस्ता दुरुस्तीकरण करण्याचे निर्देश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिले.

टिळकनगर-एकलहरे शिवरस्ता टिळकनगर कारखान्याच्या आत घेऊन व त्याची होणारी वहिवाट बंद केली. त्यामुळे होऊन वहिवाट अन्य ठिकाणाहून वळविली गेली. तसेच कारखान्याच्या जड वाहतुकीमुळे या रस्त्याची दुर्दशा होऊन मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. ग्रामपंचायतीकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कारखाना प्रशासनाला वेळोवेळी लेखी स्वरूपात कळविले. मात्र त्याकडे नेहमी दुर्लक्ष केल्याने एकलहरे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर तहसीलदार पाटील यांनी कारखाना प्रशासन व एकलहरे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची आपल्या दालनात बैठक घेऊन दोन्ही बाजूने सविस्तर म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी बाजू मांडताना सांगितले की, डहाणूकर उद्योग समूहाने एकलहरेचा शिवरस्ता कारखान्याच्या ताब्यात घेऊन भिंतीचे बांधकाम करून वाहतूक अन्यत्र वळवली. त्यामुळे टिळकनगर एकलहरे हा रस्ता अत्यंत खराब व निकृष्ट दर्जाचा झाला. रस्ता बेकायदेशीर वळविल्याने ग्रामपंचायतीला रस्ता दुरुस्तीसाठी निधी खर्च करता येत नाही. कारखाना प्रशासनाकडून सुधीर वर्पे म्हणाले, डहाणूकर उद्योग समूहात व्यवस्थापक म्हणून आपण नुकतेच काम सुरू केले असून मी व सहकारी अधिकार्‍यांसह कारखान्याचे सर्वेसर्वा अमित डहाणूकर यांच्याकडे बैठकीचा वृत्तांत कळवून पुढील कामकाजाची लवकरच रूपरेषा ठरवू. एकलहरे ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनावर निश्चित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सारभाई जहागीरदार, पत्रकार लालमोहमद जहागीरदार, विलासराव ठोंबरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष नूरअहेमद जहागीरदार, सिराज आलम, अनिस शेख, विजय कुर्‍हे, ग्रामसेवक समीर मणियार, सरपंच रिजवाना शेख, ग्रामपंचायत सदस्या नसीमखातून जहागीरदार, अनुसया ठोंबरे, आशा कांबळे, रावण निकम, निर्मला झिने, कोकिळा अग्रवाल, पूजा चौधरी, बबन झिने, संजय अग्रवाल, हरिश कुर्‍हे, किरण कुर्‍हे, पत्रकार रिजवान जहागीरदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीत एकलहरे येथील ग्रामस्थांनी कारखान्याच्या कायदेशीर सल्लागाराला बसण्यास विरोध केला. सल्लागार प्रत्येक कामात कुरघोडी करत असल्याचा आरोप करून त्यांना बैठकीला बसू देऊ नये,अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने अखेर कारखान्याकडून आपली बाजू मांडण्यासाठी आलेले व्यवस्थापक सुधीर वर्पे यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com