
टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे व राहाता तालुक्यातील रांजणखोल कार्यक्षेत्रात वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. शेतातील उभे असलेले ज्वारी, मका, गहू, हरभरा, कांदे, भाजीपाला आदी पिकांना ते जमीनदोस्त करीत आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
जंगली प्राणी रानडुक्कर, हरिण, कोल्हे हे प्राणी रात्रीच्यावेळी शेतात येऊन पिकांची नासाडी करत आहेत. सदर प्राणी उभ्या झाडांना मोडून ज्वारी, मकासह आदींचे झाड मोडल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतीला लावलेला खर्च निघतो की नाही हा प्रश्न शेतकर्याना भेडसावत आहे. सरपटणार्या प्राण्यांमुळे बरेच शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. तारांच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडण्यास वन विभागाची मनाई असल्याने आम्ही वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण कसे करावे? असा प्रश्न परिसरातील शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.
वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. बरेचदा नुकसान मोठे व भरपाई कमी असा प्रकार घडतो. त्यामुळे आर्थिक संकट शेतकर्यावर येते. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे उत्पन्नात चांगलीच घट येऊ शकते. याकरिता संबंधित विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बाळकृष्ण गिरमे, अनिल साळुंके, रवी निर्मळ, आकाश गिरमे, आदेश गिरमे, रय्यान शेख, मलिक जहागीरदार, खलीक जहागीरदार, सुलेमान शेख, खरपसे यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.