
टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar
श्रीरामपूर तालुक्यात विशेषकरून एकलहरे, उक्कलगाव, बेलापूर परिसरात कांद्याची लागवडीची लगबग सुरू आहे. परतीच्या व अवकाळी पावसाने कादा रोपांचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना अधिक मागणी आहे. त्यामुळे रोपांना भाव आला आहे.
शेतकर्यांनी सप्टेंबर महिन्यात कांदा बियाणे टाकले होते. रोप चांगल्यापैकी उगवले होते. परंतु आक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जी कांद्याचे बियाणे टाकली होती ती जागीच दाबली गेली. आणि जी काही उतरली होती, ती कोवळी असल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन सततच्या पावसामुळे नष्ट झाली. त्यानंतर शेतकर्यांनी पुन्हा नवीन जमीन तयार करून शिल्लक असलेले कांद्याचे बियाणे टाकले. परंतु पुन्हा पंधरा दिवसांनी जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कांद्याच्या रोपाच्या वाफ्यात पाणी साचून रोपे पाण्यात सडून गेली. त्यामुळे आता कांद्याची रोपे शिल्लक राहिले नाही.
ज्या शेतकर्यांनी चार ते पाच हजार रुपये पायली भावाने कांदा बियाणे विकत घेऊन टाकले त्याच रोपांची किंमत आता एकरी तब्बल 15 ते 20 हजार रुपयांवर गेली आहे. परंतु तेही मिळत नाही. लागवड झाली तर पुढे निदान कांद्याला भाव मिळेल, या आशेने रोप कोठे मिळते का म्हणून कांदा उत्पादक शेतकरी ग्रामिण भागात रोपांचा शोध घेताना दिसून येत आहे. त्यामुळे कांद्याच्या रोपांना अधिक भाव आला आहे. रोपांची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा भासू लागला आहे.
तालुक्यातील एकलहरे, उक्कलगाव परिसरात कांद्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यासाठी शेतकर्यांनी शेतात कांदा रोपांचे नियोजन केले होते. मात्र जोरदार पावसाने कांदा रोपे वाया गेल्याने रोपांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. सध्या कांदा लागवडीचे चित्र पाहिले तर शेतकर्यांना भरमसाठ पैसे खर्च करुन कांद्याची रोपे बाहेरून खरेदी करावी लागत आहेत. हा खर्च निश्चितच शेतकर्यांना परवडणारा नाही.
- श्रीहरी बाराहाते, प्रगतशील शेतकरी.
चालू वर्षी कांदा लागवड करताना शेतकर्यांचा कांदा उत्पादनाचा खर्च देखील वाढणार आहे. चालू वर्षी एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड केल्यास साधारणत: 50 ते 55 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. रोपे वाढीच्या अवस्थेतच पाऊस पडल्याने कांद्याची रोपे पूर्णत: सडून गेली. त्यामुळे शेतात कांदा लागवड करायची असेल तर कांद्याची रोपे भरमसाठ पैसे देऊन आणण्याशिवाय शेतकर्यांसमोर पर्याय नाही.
- विजय माळवदे, प्रगतशील शेतकरी.