"एक तरी मोदक खा ना गणूल्या रे"; ढवळपुरीच्या 'श्री' च्या गाण्याने केली धमाल

जगभर लाखोंच्या संख्येत चाहते
"एक तरी मोदक खा ना गणूल्या रे"; ढवळपुरीच्या 'श्री' च्या गाण्याने केली धमाल

भाळवणी (प्रतिनिधी)

स्वर जर संगीतातील भावभावना व्यक्त करणारी संवेदना असेल तर लय किंवा ताल ही त्यात चेतना व उत्साह भरतात. संगीतातील मधुरता जेव्हा कानावर पडते तेव्हा आपोआपच शरीरात प्रसन्नता, ऊर्जा, चैतन्य निर्माण होते. कारण संगीत ही एक अशी कला आहे, ती इतरांपुढे मांडताना, त्याला संगीताची आवड असो किंवा नसो त्याला जर तिने मंत्रमुग्ध केले तर मात्र धमालच होते आणि ही धमाल केली आहे एका चार वर्षाच्या गोंडस अशा 'श्री' जाधवने. आज संपूर्ण जगभर या श्री चे हजारो नव्हे तर लाखो चाहते झाले आले आहेत. मग 'बिग बी' अमिताभ बच्चन पण त्यात आले.

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील जाधव कुटुंबातील तान्हाजी जाधव हे संगीत विशारद असून सध्या ते सुरत या ठिकाणी एका शिक्षण संस्थेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संगीताची मनसोक्त आवड असल्याने घरात संगीताचा 'रियाज' ही दैनंदिन क्रिया आहे. याचा त्यांची कन्या श्रेया व चार वर्षाच्या 'श्री' ला सुद्धा लळा लागला, असेच म्हणावे लागेल. कारण या चार वर्षाच्या श्री ने गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच गणेशावर एक बालगीत गायल्याने त्याची चर्चा संपूर्ण जगभर पसरली आहे. गणेशोत्सव म्हणजे संस्कृती, परंपरा व उत्साहाचे वातावरण व या वातावरणाला आपल्या बोबड्या बालगीतातून सादर करून संपूर्ण जगालाच श्रीने भुरळ घातली आहे. आपल्या बोबड्या आवाजातील "एक तरी मोदक खा ना गणूल्या रे" या गीताचे रेकॉर्डिंग झाल्यावर त्याचे वडील तान्हाजी जाधव यांनी ते युट्युब वर टाकल्यानंतर एका रात्रीतून त्याचे लाखो दर्शक झाले आहेत. तर फेसबुक, युट्युब, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर श्रीला शुभेच्छा देणाऱ्या पोस्टचा अक्षरशः पाऊसच पडत आहे. स्वतः 'बिग बी' अमिताभ बच्चन ही त्यातून सुटले नाही.

'श्री' जाधव हा चार वर्षाचा असून त्यानेही गणेशावरील गीत रेकॉर्डिंग होत असताना त्यात तो किती तल्लीन होऊन हावभाव करीत गात आहे हे पाहिल्यावर असे वाटते की, त्याने जणू संगीतामध्ये मास्टरकिच केली आहे. चार वर्षाचे वय हे खेळणे, बागडणे, बोलायला शिकणे याचे असते. मात्र येथे तर या बालकलाकाराने स्टुडिओमध्ये अशाप्रकारे गीत गायले की जणू कोणीतरी मोठा गायक बिनधास्तपणे गायन करीत आहे. त्याच्या या धाडसाने दाखवून दिले की बालवयात ही आपण बरेच काही साध्य करू शकतो. मागील वर्षी दिवाळीच्या काळात तान्हाजी जाधव स्वतःच्या घरी संगीताचा 'रियाज' करीत असताना 'श्री' ही त्यांच्या मागे म्हणत असताना त्याला संधी मिळाली नाही म्हणून "मला म्हणू द्या ना" असे म्हणणारा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळीही त्याची सर्वत्र चर्चा झाली होती.

श्रीच्या या गाण्यानं मात्र जगभरात त्याचे लाखोने चाहते निर्माण केले आहे. 'श्री' प्रमाणेच तान्हाजी जाधव यांची कन्या श्रेया जाधव हीसुद्धा संगीतामध्ये असून तिनेही तान्हाजी जाधव यांच्यासोबत अनेक गाणे गायले आहेत. तान्हाजी जाधव हे स्वतः संगीतकार व गायक असल्याने त्यांनी अनेक मराठी, हिंदी गाणे तसेच विशेष करून गझल यांचे सुंदर असे गायन केले आहे. या जाधव कुटुंबाच्या या संगीत सेवेमुळे पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावाचे नाव सातासमुद्रापलीकडे गेले आहे यात शंकाच नाही. विशेष म्हणने 'श्री' ने गायलेल्या या गिताची रचनाही पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील शांताराम खामकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.