अहमदनगर|Ahmedagar

कामानिमित्त कुटुंबियांसह बाहेरगावी गेलेले शहरातील व्यापारी मुकेश मोतीलाल लोढा यांचा बंगला चोरट्यांनी फोडला.

लोढा यांच्या बंगल्यामधून दोन लाख 50 हजार रूपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिणे असा आठ लाख 54 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. लोढा शुक्रवारी घरी आल्यानंतर त्यांना बंगल्यामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी मुकेश लोढा यांचा शहरातील विनायकनगरमध्ये परमेष्टी नावाचा बंगला आहे. लोढा कुटुंबीय 7 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बंगल्याला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. यानंतर चोरट्यांनी त्यांचा बंगला फोडला. बंगल्यातील अडीच लाखाची रोकड व सोन्या- चांदीचे दागिणे असा आठ लाख 54 हजारांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता लोढा कुटुंबीय घरी आले. त्यावेळी त्यांना बंगल्याचे कुलूप तोडलेले लक्षात आले. बंगल्यामधील सामानाची उचकापाचक केली होती. तर रोख रक्कम, दागिणे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहे.