श्रीरामपूर येथे ईद उत्साहात साजरी

मुस्लिम बांधवांनी केले घरातच नमाज पठण
श्रीरामपूर येथे ईद उत्साहात साजरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद काल शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. लॉकडाऊनमुळे जामा मशिदीत सामूहिक नमाज नसल्यामुळे सर्वांनी सकाळीच आपापल्या घरात व दिलेल्या संख्येच्या अटीत राहून मशिदीमध्ये नमाज अदा केली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. घराघरांतून शीरखुर्मा, गुलगुले, शेवया, भजी यांचा आस्वाद घेत ईदच्या शुभेच्छा देत आनंदी वातावरणामध्ये ईद साजरी झाली. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या समाजबांधव, नातेवाईक, मित्र परिवारातील सदस्य यांच्यासाठी प्रत्येकाने फिरतची दुआ केली.

सामूहिक नमाज पठण नसल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सोशल मीडिया व फोन वरून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पुढारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी फोनवरूनच शुभेच्छा दिल्या.

रमजान महिना व जोडीला आलेला लॉकडाऊन या परिस्थितीमध्ये गेला महिनाभर पोलीस यंत्रणेने शहरांमध्ये विशेषत: वॉर्ड नंबर 2 मध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. रमजान काळामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस प्रशासनाने मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी वारंवार संवाद साधून महिनाभर परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळली. याबद्दल मुस्लिम समाजाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण, अ‍ॅड. समीन बागवान, साजिद मिर्झा, अहमदभाई जहागिरदार, रईस जहागिरदार, अल्तमश पटेल, मुन्ना पठाण, सोहेल दारुवाला, डॉ. तौफिक शेख आदिंनी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com