एसटीचे आंदोलन चिघळल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

एसटीचे आंदोलन चिघळल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

रहिमपूर (वार्ताहर)

गेल्या पंधरा दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. त्यामुळे या संपावर तात्काळ तोडगा निघावा आणि लालपरी आपल्या गावी यावी व शिक्षणासाठी तिच्यात बसून जाता यावे अशी अपेक्षा विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन लवकर निकाली निघेल याची शाश्वती सध्यातरी दिसत नसल्याने विद्यार्थी वर्गाची धाकधूक वाढली आहे. गत दोन वर्षांपासून कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती. मात्र आता कोविडचे संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्याने संगमनेरातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत.

मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ऑफलाईन शिक्षणाचा उपयोग होताना दिसत नाही. अनेक विद्यार्थ्यांना गावी बस येत नसल्याने या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे एसटीच्या या संपाने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. काही दिवसांत परीक्षेचे दिवस येणार असल्याने विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचीही धाकधूक वाढली आहे.

संगमनेरच्या ग्रामीण भागातून संगमनेर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी जात येत असतात. मात्र एसटीच्या या संपामुळे विद्यार्थ्यांना संगमनेरला जाण्यायेण्यास मोठी अडचण होत आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू होऊनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी अडचण यानिमित्ताने पुढे आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर संप मिटवावा आणि आपल्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाता यावे, अशी अपेक्षा विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com