
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शालेय संचमान्यतेत अनेक वर्षांपासून शिक्षक पदे नव्हती. अनेक शिक्षक संघटना, विषय संघटना यांच्या मागण्यांचा आघाडी सरकारने विचार करून
संचमान्यतेत नसलेली शिक्षक पदे पुन्हा घेण्याबाबत संचमान्यतेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संचमान्यतेच्या निकषात काही त्रुटी असतील, तर त्यासंदर्भात विचार करून सर्व समावेशक निर्णय लवकरच जाहीर करू.
तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक पदाबाबत संघटनेच्या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ नगरचे राज्य कोअर कमिटी सदस्य बी.डी. जाधव व पी. डी. वाघमारे यांच्यासमवेत जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चेप्रसंगी त्यांनी आश्वासन दिले. यावेळी फिजीकल डिस्टन्सचे पालन करत निवेदन देण्यात आले. संचमान्यतेत बहुतांश शाळेत 2014-15 सालापासून शारीरिक शिक्षकांबरोबर दोन भाषा शिक्षक, एक गणित-विज्ञान शिक्षक, कला व कार्यानुभव शिक्षक दाखविले जात नव्हते.
विशेष शिक्षक व इतर शिक्षकांना 2015-16 पासून 6 ते 8 मध्ये वर्गीकृत करण्यात आले होते. तेव्हापासून व्यवस्थेत होते पण तांत्रिकदृष्ट्या ते अतिरीक्त पद ठरले होते. नव्याने संचमान्यता निकष शासनाला पाठविले असून, या नवीन निकषाने मात्र असे शिक्षक संचमान्यतेत घेतले जाणार असल्याने शाळा शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, समन्वय समिती व अमरावती महामंडळाच्यावतीने मंत्री महोदयांचे व शासनाचे जाधव बी. डी. यांनी स्वागत केले.
संचमान्यतेतील नवीन निकषात काही त्रुटी असून शारीरिक शिक्षक पद हे 28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयात सहावे पद, तर 2013 च्या शासन निर्णयात तुकड्यांवर आधारीत होते. मात्र नवीन संचमान्यता निकषात ते आठवे दाखविले आहे. त्यामुळे दुर्गम, डोंगराळ व ग्रामीण भागात कमी पटसंख्येच्या शाळेवर हे पद अस्तित्वात राहणार नसल्याने भविष्यात अशा शाळेत शारीरिक शिक्षक भरती होणार नसल्याचे मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले.
14 मे 1987 च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा तेथे किमान एक शारीरिक शिक्षक असावा तसेच त्याची पदभरती करताना बायफोकल पद्धतीने करण्यासंदर्भात, तसेच शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कायद्यातील कलम 25 अन्वये विद्यार्थी संख्या असावी तसेच अनेक वर्षापूर्वी निर्धारीत केलेला विद्यार्थी-शिक्षक प्रमाण (पीटीआर) कमी करून 1:20, 1:25 प्रमाणे निर्धारीत करण्यात यावा, याबाबत अवगत केले. शिक्षणमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेऊन संचमान्यतेबाबत आश्वासक पाऊल उचलण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, खजिनदार घनःशाम सानप यांनी दिली.