राज्यात संवर्गनिहाय संपादणुकीत लक्षणीय फरक नाही

सर्वेक्षणातील शिक्षण - भाग - 3 || जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संपादणूक चांगली
राज्यात संवर्गनिहाय संपादणुकीत लक्षणीय फरक नाही

संगमनेर | Sangamner

शिक्षणाच्या संदर्भाने सातत्याने गुणवत्ता आणि संवर्ग यांचा काही संबंध असतो असे बोलले जाते. मात्र भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात सर्वसाधारण विद्यार्थी आणि मागाससंवर्गांतील विद्यार्थी यांच्या गुणवत्तेत फारसा दखलपात्र फरक असल्याचे अधोरेखित होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

जिल्ह्याच्या एकूण सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 10.2 टक्के विद्यार्थी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 15.9 टक्के विद्यार्थी अनुसूचित जमातीचे, 28.2 टक्के विद्यार्थी इतर मागास प्रवर्गातील, 41.5 टक्के विद्यार्थी हे सर्वसाधारण संवर्गातील होते. तर राज्यात अनुसूचित जातीचे 14.5 टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अनुसूचित जमातीचे 14.2 टक्के, इतर मागास प्रवर्गातील 36.8 टक्के, व सर्वसाधारण संवर्गातील 34.2 टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला आहे.

राज्याच्या सर्वेक्षणानुसार गणितात विषयात अचूक उत्तरे देणार्‍या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण शेकडा 28 टक्के, विज्ञानात 33 टक्के, सामाजिक शास्त्रात 35 टक्के, इंग्रजी 43 टक्के, आधुनिक भाषा 43 टक्के इतके आहे. तर अनुसूचित जमातीचा विचार करता अचूक उत्तरे देणर्‍या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण गणितात 27, विज्ञानात 30, सामाजिक शास्त्रात 34, इंग्रजी 38,आधुनिक भारतीय भाषा 40 टक्के प्रमाण आहे.

इतर मागास प्रवर्गाचा विचार करता गणितात 29 , विज्ञानात 34 , सामाजिक शास्त्रात 37, इंग्रजी 45 ,आधुनिक भारतीय भाषा 45 टक्के प्रमाण आहे. सर्वसाधारण संवर्गातील अचूक उत्तरे देणा-या विद्यार्थ्यांची संख्या गणितात 31, विज्ञानात 36, सामाजिक शास्त्रात 40 , इंग्रजी 51,आधुनिक भारतीय भाषा 45 टक्के प्रमाण आहे. अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करता गणित, विज्ञानात आधुनिक भारतीय भाषा यांच्यात अवघा तीन टक्के इतकाच फरक आहे. इंग्रजीत 8 टक्के व सामाजिक शास्त्रात 5 टक्के फरक असल्याचे प्रतिबिंबत होत आहे.एकूण सर्वच संवर्गाचा विचार करता संपादणुकीत फार लक्षणीय फरक असल्याचे दिसत नाही.

जिल्ह्याचा विचार करता इयत्ता तिसरीत भाषेत अनुसूचित जाती संवर्गाची संपादणूक 70 टक्के तर सर्वाधिक संपादणूक 77 टक्के ही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची आहे. इयत्ता पाचवीत 56 टक्के संपादणूक अनुसूचित जातीचे असून सर्वाधिक संपादणूक इतर मागास प्रवर्गातील आहे ते शेकडा प्रमाण 61 ट्कके इतके आहे. आठवीतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा संपादणूक स्तर 54 टक्के आणि इतर मागास प्रवर्गासाठी 61 टक्के संपादणूक स्तर नोंदविला गेला आहे.गणितात तिसरीत सर्वाधिक संपादणूक स्तर हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची असून ती शेकडा 75 टक्के तर सर्वात कमी जातीची असून ती 63 टक्के आहे.

पाचवीसाठी अनुसूचित जातीचा संपादणूक स्तर 47 असून सर्वाधिक संपादणूक सर्वसाधरण संवर्गातील आहे ती 49 टक्के आहे.आठवीसाठी जमाती आणि सर्वसाधरण संवर्गाची संपादणूक समान असून ती 38 टक्के इतकी आहे.दहावीत अनुसूचित जातीचा संपादणूक 26 टक्के तर सर्वसाधऱण संवर्गातील संपादणूक 31 टक्के इतकी आहे. विज्ञानात आठवीत अनुसूचित जमातीचे संपादणूक 40 टक्के तर सर्वसाधारण 44 टक्के व दहावीसाठीचा संपादणूक जातीची 34 टक्के असून सर्वसाधारण संवर्गातील 39 टक्के आहे.

या संपादणूक सर्वेक्षणानुसार मागासवर्गीय विद्यार्थी व सर्व साधारण संवर्गातील विद्यार्थी यांच्या संपादणूकीत फारसा फरक नाही ,उलट काही विषयाच्या बाबतीत तर अधिक संपादणूक मागास संवर्गातील विद्यार्थ्यांची अधिक आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात उत्तम स्वरूपाचे अध्ययन अनुभव मिळाल्यास कोणत्याही संवर्गातील विद्यार्थी गुणवत्तेपर्यंत सहज झेप घेऊ शकतो हे सिध्द झाले आहे. या जिल्ह्यात मात्र संपादणुकीत मागास संवर्गातील विद्यार्थ्यांचा संपादन हा अधिक उंचावलेला असल्याचे चित्र समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com