शहरापेक्षा खेड्यातील पोरं हुश्शार..

सर्वेक्षणातील शिक्षण || भाग - 2
शहरापेक्षा खेड्यातील पोरं हुश्शार..

संगमनेर | Sangamner

भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणाच्या निमित्ताने शिक्षणाचे वास्तव काही प्रमाणात समोर येण्यास निश्चित मदत झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याला स्वतंत्र धोरण घेणे शक्य असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पाच कोटी मुले शिक्षणाच्या प्रवाहात असूनही त्यांना पायाभूत क्षमता प्राप्त नसल्याची बाब समोर आली होती. ती चिंता व्यक्त होत असताना या सर्वेक्षणातही त्या स्वरूपाची आकडेवारी अहवालात प्रतिबिंबीत झाली आहे. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संपादन स्तरातही काहीसा फरक दिसून येत आहे. मात्र संपादणुकीत खेड्यातील विद्यार्थ्यांचा वरचष्मा असल्याचे अधोरेखित झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्व विषयात खेड्यातील पोरं हुशार असल्याचे अहवालात अधोरेखित झाले आहे.

राज्याच्या अहवालात आठवी व दहावीच्या वर्गात शहरी विभागाचा आलेख उंचावलेला असला तरी फरक मात्र फार दखलपात्र असल्याचे जाणवत नाही. शहरी भागात पुरेशा सुविधा असतानाही तितका परिणाम संपादणुकीवर झालेला दिसत नाही. त्यामुळे शिक्षणातील पारंपरिक विचारधारेला धक्का बसताना दिसत आहे.

राज्याच्या अहवालानुसार इयत्ता तिसरीत भाषा विषयाच्या संपादणूक सर्वेक्षणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संपादणूक 68 टक्के तर शहरी भागातील 66 टक्के. पाचवीत ग्रामीण क्षेत्रात 59 टक्के, शहरी भागात 58 टक्के, आठवीत शहरी भागाचा आलेख उंचावलेला असून तेथे ग्रामीण संपादणूक 55 टक्के तर शहरी क्षेत्राचे संपादणूक 59 टक्के इतकी आहे. गणिताच्या संपादणुकीत देखील ग्रामीण क्षेत्राचा वरचष्मा राहिला आहे. तिसरीत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे संपादणूक 63 टक्के तर शहरी भागाची संपादणूक 60 टक्के आहे. पाचवीचा संपादणुकीत ग्रामीण क्षेत्रात 47 तर शहरी क्षेत्रात 44 संपादणूक आहे.

आठवीत मात्र शहरी आणि ग्रामीण असा फरक दिसून येत नाही. दोन्ही क्षेत्राचे संपादणूक केवळ 34 टक्के इतकीच आहे.त्याचबरोबर दहावीत ग्रामीण संपादणूक 29 टक्के असून शहरी विद्यार्थ्यांचे संपादणूक 30 इतकी आहे. परिसर अभ्यासात ग्रामीण तर विज्ञान विषयात शहरी विद्यार्थ्यांचा वरचष्मा असल्याचे दिसते. तिसरीच्या परिसर अभ्यासात ग्रामीण क्षेत्राची संपादणूक 63 टक्के, शहरी क्षेत्राची संपादणूक 61 आहे. पाचवीत ग्रामीण क्षेत्रात 53 टक्के व शहरी क्षेत्राची संपादणूक 50 टक्के आहे. आठवी विज्ञानात ग्रामीण क्षेत्राची संपादणूक 38 टक्के तर शहरी विभागाची संपादणूक 40 टक्के आहे.

दहावीचा संपादणूक स्तरात ग्रामीण 33 टक्के व शहरी क्षेत्राची 36 टक्के संपादणूक आहे. सामाजिक शास्त्राचा विचार करता आठवीत शहरी व ग्रामीण क्षेत्राचा संपादणूक पातळीत कोणताही फरक नाही.सरासरी 40 टक्के संपादणूक आहे. दहावीत ग्रामीण संपादणूक 36 टक्के आहे तर शहरी संपादणूक 39 टक्के आहे.इंग्रजी विषयात 42 ग्रामीण तर शहरी संपादणूक 51 टक्के आहे.राज्याच्या एकूण सर्वेक्षणात ग्रामीण भागाचा वरचष्मा असलेला दिसत आहे. साधारण तिसरी व पाचवीत ग्रामीण क्षेत्रातील संपादणूक उंचावलेली आहे. तर आठवी व दहावीत शहरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची संपादणूक उंचावलेली दिसत आहे. शहरी भागातील शिकवणी वर्गाचा तो परिणाम असावा असे अभ्यासकांना वाटते. मात्र या स्तरावरील फरक मात्र दखलपात्र ठरत नाही.

अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता सर्व इयत्तांच्या भाषा विषयासाठीची सरासरी संपादणूक ग्रामीण क्षेत्राची 75 टक्के तर शहरी भागातील संपादणूक 68 आहे. परिसर अभ्यास विषयासाठी ग्रामीण संपादणूक 69 टक्के आहे तर 62 टक्के विद्यार्थी संपादणूक शहरी भागातील आहे. गणित विषयाचा विचार करता ग्रामीण विद्यार्थ्यांची संपादणूक 70 टक्के आहे. तर शहरी भागातील विद्यार्थ्यांची संपादणूक सरासरी 61 टक्के इतकी आहे. जिल्ह्याच्या एकूण सरासरी संपादणुकीत सर्वच विषयावर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वरचष्मा राहिलेला दिसतो आहे. त्यामुळे शहराती मुलांची गुणवत्ता अधिक असते असे चित्र नगर जिल्ह्यात दिसत नाही. शहरी मुलांच्या सुविधा, तेथील शाळांमधील सुविधा अधिक असतात,). शिक्षक हुशार असतात त्यामुळे निकाल उंचावतो हा पारंपारिक समज जिल्ह्यात खोटा ठरला आहे.

(क्रमशः)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com