सरकारी शाळांची संपादणूक खासगी शाळांपेक्षा सरस

सर्वेक्षणातील शिक्षण- भाग - 4 || जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या मोठी
सरकारी शाळांची संपादणूक खासगी शाळांपेक्षा सरस

संगमनेर | Sangamner

राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात सरकारी शाळांची संपादणूक उंचावत असल्याची बाब समोर आली आहे.त्यामानाने खाजगी संस्थाच्या शाळांची संपादणूक काही प्रमाणात घसरत आहे. राज्य सरकारच्या शाळांचा संपादणूक आलेख उंचावलेला दिसत असताना केंद्र सरकारच्या शाळांचा आलेखही काहीसा घसरत आहे. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा म्हणजे संपादणूक उंचावलेली या गृहितकाला धक्का बसला आहे. येत्या काळात संस्था चालकांना आपल्या शाळांचा संपादणूक उंचावण्यासाठी अधिक दक्ष राहाण्याची गरज आहे. राज्यात एक लाख दहा हजार शाळा आहेत.त्यातील 65 हजार शाळा या शासन, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत. अशा परीस्थितीत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि त्याचवेळी संपादणूक वाढीचे आव्हान पेलावे लागणार आहे.

राज्यात साधारण पहिली ते चौथीच्या अधिकाधिक शाळा या शासनाच्या आहेत. पाचवीचे काही वर्ग सरकारचे आणि काही खाजगी संस्थाचे आहेत.मात्र आठवी व दहावीचा विचार करता राज्यातील सर्वाधिक शाळा या खाजगी व्यवस्थापनाच्या आहेत. या स्तरावर सर्वाधिक संपादणूक कमी असल्याची बाबही या निमित्ताने समोर आली आहे. इयत्ता दहावीतील 77 टक्के विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संपादणूक पायाभूतच्या खाली आहे. साधारण 40 टक्क्याच्या आत या इयत्तांचा संपादणूक स्तर आहे. भाषेच्या संपादणुकीची सरासरी पाहता शासकीय शाळांची संपादणूक 70 टक्के आहे.शासन मान्य व अनुदानित शाळांची संपादणूक 68 टक्के, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांची संपादणूक सरासरी 63 टक्के तर केंद्र सरकारच्या शाळांचा संपादणूक स्तर 60 इतका आहे. राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सरासरी 63 टक्के इतकी आहे.

गणिताची संपादणुकीची सरासरी पाहता शासकीय शाळांची संपादणूक 64 टक्के आहे.शासन मान्य व अनुदानित शाळांची संपादणूक 62 टक्के, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांची संपादणूक सरासरी 57 टक्के तर केंद्र सरकारच्या शाळांचा संपादणूक स्तर 54 इतकी आहे. संपादणुकीची राष्ट्रीय सर्वाधिक सरासरी 58 टक्के आहे. परिसर अभ्यासाची संपादणुकीची सरासरी पाहता शासकीय शाळांची संपादणूक 65 टक्के आहे.शासन मान्य व अनुदानित शाळांची संपादणूक 63 टक्के, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांची संपादणूक सरासरी 58 टक्के तर केंद्र सरकारच्या शाळांचा संपादणूक स्तर 54 इतका आहे. या विषयाची राष्ट्रीय सरासरी 58 टक्के आहे. राज्याचे सारखेच कमी अधिक प्रमाणात देशातील सरकारी शाळेतील आलेख उंचावलेला आहे. त्यामुळे सरकारी शाळांची वाढता संपादणुकीचा आलेख हा सरकारी शाळांची विश्वासार्हता उंचावणारा ठऱणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील भाषेच्या संपादणुकीची सरासरी पाहता शासकीय शाळांची संपादणूक 7 7 टक्के आहे. शासन मान्य व अनुदानित शाळांची संपादणूक 73 टक्के, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांची संपादणूक सरासरी 67 टक्के तर केंद्र सरकारच्या शाळांची संपादणूक स्तर 44 टक्के इतका आहे. गणित विषयाची संपादणुकीची सरासरी पाहता शासकीय शाळांची संपादणूक 69 टक्के आहे. शासन मान्य व अनुदानित शाळांची संपादणूक 70 टक्के, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांची संपादणूक सरासरी 63 टक्के तर केंद्र सरकारच्या शाळांचा संपादणूक स्तर 43 इतका आहे.

येथे शासकीय शाळांपेक्षा खाजगी अनुदानित शाळांची संपादणूक एक टक्क्याने अधिक आहे. परिसर अभ्यासाची संपादणुकीची सरासरी पाहता शासकीय शाळांची संपादणूक 69 टक्के आहे. शासन मान्य व अनुदानित शाळांची संपादणूक 68 टक्के, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांची संपादणूक सरासरी 63 टक्के तर केंद्र सरकारच्या शाळांचा संपादणूक स्तर 43 इतका आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सरकारी शाळांच्या संपादणूकीपेक्षा जिल्ह्यातील सरकारी शाळांचा संपादणूक स्तर अधिक आहे.

जिल्ह्याातील क्षमता प्राप्त नसल्याचे प्रमाण भाषा 15 टक्के,गणित 12 टक्के , परिसर अभ्यास 12 टक्के, पायाभूत क्षमता प्राप्त भाषा 32 टक्के, गणित 30 टक्के आणि परिसर अभ्यास 29 टक्के इतकी आहे. प्राविण्य स्तरावर भाषा 34 टक्के,गणित 37 टक्के , परिसर अभ्यास 43 टक्के इतके आहे. विशेष स्तर प्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाण भाषा 19 टक्के , गणित 20 टक्के आणि परिसर अभ्यास 17 टक्के इतकी आहे. प्राविण्य आणि विशेष स्तर प्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com