
आरडगाव |वार्ताहर| Aradgav
जिल्हा परिषद शैक्षणिक विभागाचा नुकत्याच पार पडलेला तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम आता वादाच्या भोवर्यात सापडला आहे. सदर सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या परिपत्रकाच्या नियमांचे उल्लंघन करून नेमण्यात आलेल्या परीक्षकांनी निकाल घोषित केल्याचा आरोप खुडसरगाव ग्रामस्थांनी केला आहे.
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान गटात गोपाळवाडी (उंबरे) शाळेचा प्रथम, खुडसरगाव शाळेचा द्वितीय तर विठ्ठलवाडी (केंदळ बुद्रुक) शाळेचा तृतीय क्रमांक घोषित करण्यात आला. मात्र यामध्येे प्रथम क्रमांक आलेल्या गोपाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी भारूड नाटीका सादर केली.
या सादरीकरणाची वेळ परिपत्रकात पंधरा मिनिटे असताना सदर नाटीका अठरा मिनिटे पन्नास सेकंद चालली. तसेच खुडसरगाव शाळेची नाटीका तेरा मिनिटे अठ्ठावीस सेकंद चालली. यामध्ये गोपाळवाडी शाळेच्या नाटिकेत नियमांचे उल्लंघन झाले. वास्तविक पाहता खुडसरगाव शाळेचा प्रथम क्रमांक येणे क्रमप्राप्त होते मात्र गोपाळवाडी शाळेचा प्रथम क्रमांक घोषित केल्याने जिल्हास्तरीय स्पर्धेतून खुडसरगाव शाळा बाहेर पडली.
कार्यक्रम सुरू असतानाच खुडसरगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब देठे यांनी सदर बाब गटशिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत आक्षेप घेतला होता. मात्र अंतिम निकाल राखून ठेवला असताना तक्रारदारास न कळवता शिक्षण विभागाने हा निकाल घोषित केला. त्यामुळे खुडसरगाव शाळेचा प्रथम क्रमांक न येता द्वितीय क्रमांक आल्याने पालकांमध्ये देखील कमालीची नाराजी पसरली आहे.
याविरोधात तालुका गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुन्हा चौकशी करून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी खुडसरगांव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब देठे, नितीन येवले, किशोर माकोणे, सचिन पवळे, अनिल थावरकर, संदीप पवार, नानासाहेब पवार, सोमनाथ नवाळे, बाळासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, गणेश पवार आदिंनी केली आहे.
परीक्षकांच्या काही चुकांमुळे आमचा प्रथम क्रमांक न येता द्वितीय क्रमांक आला त्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेतून आमच्या शाळेला बाहेर पडावे लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसह पालकांचा हिरमोड झाला म्हणून सदर बाबीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेता येईल.
- आप्पासाहेब देठे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती खुडसरगांव
सदर तक्रारदाराचा अर्ज आल्यानंतर परीक्षकांचा उपस्थित पालकांचा आणि तक्रारदारांचा अहवाल घेण्यात आला असून तो अहवाल वरिष्ठांना पाठवलेला आहे. त्यानुसार मार्गदर्शक सूचना आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- गोरक्षनाथ नजन गटशिक्षणाधिकारी, राहुरी