विषारी गवत खाल्ल्याने पाच गायी दगावल्या

धोंडेवाडी व अंजनापूर येथील घटना
File Photo
File Photo

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी व अंजनापूर या गावामध्ये अज्ञात आजाराने पाच गायी मृत्यमुखी पडल्या आहेत.

विषबाधेमुळे गायींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मृत गायींचे शवविच्छेदन करून तपासणीसाठी नमुने पुणे येथे पशुरोगनिदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

धोंडेवाडी येथील आबासाहेब भडांगे यांच्या चार गायी दगावल्या तर अंजनापूर येथील संजय गोरक्षनाथ गव्हाणे यांची एक गाय मृत्युमुखी पडली. या सर्व गायींमध्ये विषबाधेच्या आजारात दिसणारी लक्षणे दिसत होती. प्रथमदर्शनी ही नायट्रेट विषबाधा असल्याची शक्यता आहे. विषारी गवत खाल्याने ह्या गायी दगावल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकांनी व्यक्त केला आहे.

कोपरगाव लघुचिकीत्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, कोपरगांव पं.स.चे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे व डॉ. करण खर्डे, डॉ. अशोक भोंडे आदींनी मृत गायींचे शवविच्छेदन करून नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच जनावरांचा मृत्यु कशामुळे झाला हे कळणार आहे. अचानक गायी दगावण्यास सुरुवात झाल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर आजारी जनावरांवर पशुवैद्यकांनी उपचार करून त्यांना वाचविण्यात यश मिळविले आहे.

या गायींवर डॉ. अजयनाथ थोरे, डॉ. दिलीप दहे, डॉ. करण खर्डे, डॉ. अरुण गव्हाणे, डॉ. अशोक भोंडे, डॉ. विनायक थोरात, डॉ.पवम रोहमारे, डॉ. रमेश पाचोरे यांनी उपचार केले.

गवत विषबाधेची शक्यता धरून पशुपालकांनी जनावरांना गवत घालतांना काळजी घ्यावी. नेहमीच्या गवतापेक्षा वेगळे दिसणारे गवत बाजुला काढून टाकावे. काठेमाठ व ढोलअंबा यासारखे विषारी गवत जनावरांच्या चार्‍यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. सध्या गवत घालणे टाळले तर योग्य राहील.

- डॉ.अजयनाथ थोरे, सहाय्यक आयुक्त.

ह्या जनावरांना प्रथमदर्शनी अन्न विषबाधेची लक्षणे दिसत होती. मृत जनावरांचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जनावरे आजारी पडण्याची लक्षणे दिसल्यास तातडीने पशुवैद्यकांशी संपर्क करावा.

- डॉ.दिलीप दहेे, पशुधन विकास अधिकारी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com