
घारी |वार्ताहर| Ghari
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम कोपरगाव तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी फेरफार अर्ज प्रणाली ई हक्क प्रशिक्षण कार्यक्रम देखील घेतले असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांनी दिली.
राज्य शासनाच्या महसूल व वनविभाग डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात कोणत्याही खातेदाराला किंवा संबंंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी सातबारावर फेरफारच्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून या ई हक्क प्रणालीद्वारे दाखल करता येणार आहेत.
याद्वारे इकरार, बोजा दाखल करणे, गहाणखत, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब कर्ता नाव कमी करणे, विश्वस्ताचे नाव कमी अथवा बदलणे, संगणकीकृत सातबारा मधील चूक दुरुस्त करणे आदी फेरफार नोंदी करता येणार आहेत. फेरफारसाठी लागणारी कागदपत्रे स्कॅन करून पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतात. ई हक्क प्रणाली मधून दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर मिळेल व अशा अर्जाची स्थिती अर्जदारास प्रत्येक टप्प्यावर तपासता येईल व प्रत्येक टप्प्यावर अर्जदारास मोबाईल वर संदेश येईल.
ई हक्क प्रणालीतून भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल. तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्विकारील अथवा कारण देऊन पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्तीसाठी पाठवेल किंवा पूर्णत: कारण नमूद करून नाकारतील. यासाठी प्रत्येक अर्जदाराने आपला मोबाईल नंबर देऊन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सेतू कार्यालयाला 50 रू. फी द्यावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नये असेही भोसले यांनी सांगितले.
ई हक्क ही प्रणाली तलाठी यांचे कडील ई फेरफार प्रणालीला पूरक असून त्यामधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफारमध्ये प्राप्त करून फेरफारमध्ये रूपांतरीत करता येणार आहेत. त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणाली सोबत संलग्न करण्यात आलेली आहे.
ई हक्क प्रणालीमध्ये 9 फेरफार नोंदी अंतर्भूत केल्यामुळे वरिष्ठ महसूल अधिकारी यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी एमआयएस उपलब्ध आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता येण्यास आणखी मदत होणार आहे. नागरिकांचा वेळ, हेलपाटे वाचणार आहेत तसेच तलाठी कामकाज पारदर्शक होऊन प्रलंबित अर्जाचे पर्यवेक्षण सोपे होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा.
- संदीप कुमार भोसले, तहसीलदार