ई पीक पाहणी शेतकर्‍यांसाठी नव्या युगाची सुरुवात - ना. थोरात

ई पीक पाहणी शेतकर्‍यांसाठी नव्या युगाची सुरुवात - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महाविकास आघाडी सरकार मध्ये मागील दीड वर्षापासून महसूल मंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह दोन ऑक्टोबर पासून डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नव्याने सुरू केलेल्या ई पिक पाहणी प्रकल्प हा देशासाठी आदर्शवत असून शेतकर्‍यांसाठी नव्या युगाची सुरुवात ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

आनंदवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने ‘ई पीक पाहणी’ योजनेत शंभर टक्के नोंदणी केल्याबद्दल झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आर. बी. रहाणे होते तर व्यासपीठावर महानंदा व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सुनंदाताई जोर्वेकर, मिराताई शेटे, साहेबराव गडाख, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांसह महसूल विभागाचे सर्कल, तलाठी व विविध कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी नामदार थोरात यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष ई पिक पाहणी केली. त्याचबरोबर शेतकर्‍यांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाइन डिजिटल सातबाराचे वितरणही करण्यात आले.

ना. थोरात म्हणाले, ई पीक पाहणी ही नवी योजना शेतकर्‍यांच्या जीवनात नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे. या योजनेमुळे सर्वांना स्वत:ची पीक पाहणी स्वत: नोंद करता येणार आहे. तसेच सध्या राज्यात व देशात कोणते पीक किती रोपण झाले आहे. व कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आहे. याची अद्यावत माहिती सुद्धा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना खरी तर देशासाठी आदर्शवत ठरणारे आहे. मागील दीड वर्षापासून महसूल मंत्रिपदाच्या काळात आपण नव्याने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे.

यातून ऑनलाईन सातबारा ई-फेरफार शेतकर्‍यांना अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने मिळत आहेत. सातबारावरील अनावश्यक नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. दोन ऑक्टोबर गांधी जयंती पासून सर्व शेतकर्‍यांना सातबारा घरपोच मिळणार आहे. संगमनेर तालुक्यात मागील वर्षी मॉडेल म्हणून या ई पिक पाहणी अभियानाची सुरुवात केली. आणि आज संपूर्ण राज्यामध्ये ई पीक पाहणी लागू करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली असून उर्वरित गावांमधील शेतकर्‍यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन नामदार थोरात यांनी केले.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या आदर्शवत सहकारामुळे संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाचे विविध सहकारी संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आनंदवाडी परिसरामध्ये नव्याने 3000 लिटर क्षमतेची बर्क्युलर देण्यात आले आहे.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला आधुनिक व डिजिटल चेहरा दिला आहे. मागील मंत्रिपदाच्या काळात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवून त्यांनी या विभागाला आधुनिकता व गतिमानता दिली. तसेच आता नव्याने ई पीक पाहणी, डिजिटल सातबारा हे अत्यंत आदर्श उपक्रम देशाला दिले आहे. 15 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या नव्या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने शेती उत्पादनाबाबत माहितीची स्वायत्तता मिळणार आहे. लवकरच संपूर्ण तालुका ई पीक पाहणी नोंद मध्ये शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील सर्व कर्मचारी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कैलास सरोदे, सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव राहणे, शांताराम कढणे, साहेबराव सरोदे, मुरलीधर सरोदे, बाबासाहेब सरोदे, विजय राहाणे आदींसह विविध शेतकरी उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र रहाणे यांनी केले तर आभार तहसीलदार अमोल निकम यांनी मानले.

सात गावांमध्ये 100 टक्के ई पीक पाहणीची नोंद

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ई पीक पाहणी अभियानात संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठा सहभाग घेतला असून 174 गावांपैकी आनंदवाडी, रणखांब, मा़ंची, कोळवाडे, विद्यानगर, खांडगाव, खांडगेदरा या सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली आहे तर उर्वरित गावांमधील 80 टक्के पर्यंत पोहचली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com