
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
गेल्या अडीच महिन्यांपासून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून उत्पादनात मोठी घट होऊन शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये म्हणून शेतकर्यांनी येत्या 25 ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
सौ. कोल्हे म्हणाल्या, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांचा प्रादूर्भाव व इतर कारणांमुळे पेरणी ते काढणीपश्चात पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेत बदल करून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य सरकारने शेतकर्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून सुरू झाली आहे. यापूर्वी पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकर्यांना भरावी लागत होती. मात्र आता शेतकर्यांना फक्त एक रुपयात पीक विमा काढून मिळणार असून सरकारच आता पीक विम्याची रक्कम भरणार आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना पिकांसाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील जवळपास 33 हजार 488 तर मतदारसंघात येणार्या पुणतांबा मंडळातील 11 हजार 574 शेतकर्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग, कांदा आदी पिकांची पेरणी केलेली आहे. मतदारसंघातील सुमारे 45 हजार शेतकर्यांनी पीक विम्याचे अर्ज भरले आहेत. दुष्काळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकर्यांच्या उत्पादनात घट आल्यास सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतकर्यांना आगाऊ नुकसान भरपाई देण्यात येते. मतदार संघातील पावसाची परिस्थिती ध्यानात घेऊन शेतकर्यांनाही शासनाच्या धोरणानुसार पीक विम्यापोटी आगाऊ नुकसान भरपाई देण्याची तसेच यासाठी शेतकर्यांच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत त्वरित पंचनामे करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.