ई-पॉज मशीन धोकादायक? दुकानदारांच्या अंगठ्यावर धान्य द्यावे

जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांकडे मागणी
ई-पॉज मशीन धोकादायक? दुकानदारांच्या अंगठ्यावर धान्य द्यावे

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या काळात स्पर्शापासून लांब राहणे महत्त्वाचे आहे.

पण रेशन धान्य दुकानात मात्र हाताचा अंगठा घेऊनच ऑनलाईन पद्धतीने रेशन दिले जात आहे. यातून करोनाचा प्रसार वाढण्याची भीती असल्याने नुसत्या रेशन काडार्वर धान्य द्यावे अथवा धान्य दुकानदारांच्या अंगठ्यावर कार्डधारकांना धान्य द्यावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1800 दुकानदारांचा जीव टांगणीला लागला आहे. दुकानात धान्य घेण्यास येणार्‍या कार्डधारकांचा अंगठा हातात धरुनच तो पॉज मशिनवर ठेवावा लागतो एकदा अंगठा जुळला नाही तर अनेक वेळा तीच प्रक्रिया करावी लागते. अशावेळी एखादी बाधित व्यक्ती दुकानात आल्यास दुकानदारही बाधित होऊ शकतो. तसेच त्या पुढील येणारा कार्डधारकही बाधित होऊ शकतो.

धान्य वाटप करताना मास्क, सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला तरी कार्डधाराकांचा पॉज मशिनमुळे सरळ सरळ संपर्क येत असल्याने दुकानदार बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच करोना परसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे करोनावर जोपर्यंत नियंत्रण येत नाही तोपर्यंत धान्य दुकानदारांना त्यांच्या अंगठ्यावरच धान्य देण्याची मुभा द्यावी, जेणेकरुन करोनाचा प्रसार होणार नाही.

मागील काळात रेशन दुकानातून लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता दुकानदार किंवा नॉमिनी यांचा पॉज मशीनला अंगठा लावून धान्य वाटप करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. पण आता ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे धान्य घेणार्‍या नागरिकांसह विकणार्‍या रेशन दुकानदारांनाही धोका असल्याने ई-पॉज मशीन करोनावाहक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या करोनाचा प्रादुर्भाव गावागावांत मोठ्या प्रमाणावर पोहोचला असून अंतर ठेवून आपले काम करावे, अशी शासन जनजागृती करीत आहे. मात्र त्याला रेशन दुकानदार अपवाद ठरले आहेत. यात बायोमेट्रिक मशीनमध्ये अंगठा घेण्याकरिता दुकानदार व ग्राहकांमध्ये अंतर ठेवणे कठीण आहे. प्रत्येक लाभार्थ्यांचा दुकानदारांना अंगठा घेऊनच धान्य देण्याची प्रक्रिया आहे.

राज्यात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त रेशन दुकानदारांचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात रोज करोनाबाधितांची संख्या दोन हजारांवर जात आहे. त्यामुळे रेशन दुकानांतून करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने किमान या काळात तरी ऑफलाईन पद्धतीने किंवा दुकानदारांच्या अंगठ्यावर धान्य वितरण प्रणाली सुरू करण्याची अपेक्षा दुकानदारांसह ग्राहकांमधून व्यक्त केली जात आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्यासह जिल्हा सचिव रज्जाक पठाण, नगर शहराध्यक्ष बाळासाहेब दिघे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, विश्वासराव जाधव, सुरेश उभेदळ, शिवाजीराव मोहिते, कैलास बोरावके, गणपत भांगरे, बजरंग दरंदले, भाऊसाहेब वाघमारे, गोपीनाथ शिंदे, सुरेश कोकाटे, गणेश एलम, गजानन रवाडे, सुखदेव खताळ, बाबा कराड, विजय गायकवाड, बाळासाहेब दिघे, गजानन खाडे आदींच्या सह्या आहेत.

शासनाने ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करावे किंवा ई-पॉज मशीनवर केवळ रेशन दुकानदाराचा अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याची मुभा द्यावी, यासंदर्भात निवेदन प्राप्त झाले असून स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या ऑफलाईन धान्य वाटपाच्या मागणीच्या अनुषंगाने अद्याप शासनाच्या कोणत्याही सूचना प्राप्त नाहीत. सूचना प्राप्त होताच तसे कळविण्यात येईल.

- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com