ई पीक पाहणी महाविकास आघाडी सरकारचा व्यापक प्रकल्प - ना. थोरात

ई पीक पाहणी महाविकास आघाडी सरकारचा व्यापक प्रकल्प - ना. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी)

महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ई पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नामदार थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सात बारा वर पीक पाहण्याची अचूक नोंद होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 'माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा' ही मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत १८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले असून या शेतकऱ्यांनी ह्या अॅपवर पीक पाहणी देखील नोंदवली आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा व्यापक प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पिकाची माहिती स्वतःच भरणे शक्य होणार आहे.

आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज पारदर्शक पद्धतीने आपल्या पिकाची नोंदणी करता येणार आहे. जमीन महसूल कायद्यानुसार जमिनीच्या उताऱ्यावर पिकाची नोंद करण्याची पद्धत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य आहे. शिवाय या पीक नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. आता पीक पाहणी मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांना स्वतःच पिकवत असलेल्या पिकाची माहिती अॅपमध्ये भरणे सोपे होते. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मोठी मदत होणार असल्याचेही महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून यामुळे शेतकरी अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com