ई-पीक पाहणीत पहिल्याच वर्षी अत्यल्प शेतकर्‍यांचा सहभाग

खरीप संपला तरीही कृषी व महसूल नोंदीत व्यस्त
ई-पीक पाहणीत पहिल्याच वर्षी अत्यल्प शेतकर्‍यांचा सहभाग

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेले ई पीक पाहणी अभियान पहिल्याच वर्षी शेतकर्‍यांच्या सहभागाअभावी नापास झाले आहे. 50 टक्क्यापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी या अभियानाकडे पाठ फिरविल्यामुळे खरिपाचा सिझन संपूनही अद्यापही नोंदी सुरू आहेत. नोंदी वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांवर ऑर्डर काढण्याची नामुष्की महसूल विभागावर आली आहे.

चालू वर्षी प्रथमच ई पीक पाहणी या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात केली आहे. यामध्ये शेतकर्‍यांना स्वतः ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या पिकांच्या नोंदी सातबारा उतार्‍यावर करण्याची व्यवस्था महसूल विभागाने मोबाईल अँपच्या माध्यमातून सुरू केली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून महसूल विभागाचे कर्मचारी या नोंदी वाढविण्यासाठी धडपड करीत होते. शेतकर्‍यांच्या बांधावर व शेतात जाऊन शेतकर्‍यांना ई पीक पाहणी अंतर्गत नोंदी करण्यास प्रवृत्त करीत होते. खरिपाच्या सोंगण्या संपल्या पिके काढून झाली मात्र ई पीक पाहणीची टक्केवारीने काही 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला नाही.

ऑनलाईन नोंदीची दोनदा मुदत संपली. पिकेही काढून झाली पण नोंदी वाढेना. मग महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी नोंदी वाढविण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचार्‍यांना आर्डर काढल्या.आपली मूळ कामे सोडून महसूल व कृषी अशा दोन विभागांचे कर्मचारी आता नोंदीसाठी धडपडत आहेत. विशेष म्हणजे पिकांची सोंगणी झाल्याने शेतात पिके उभी नाहीत त्यावर महसूलच्या अधिकार्‍यांनी कार्यालयातच बसून ई पीक पहाणी करण्याची शक्कल काढली आहे. अ‍ॅपमध्ये माहिती भरल्यावर मोबाईल फोनच्या कॅमेर्‍यावर बोट ठेवून फोटो काढला जात आहे. त्यामुळे अ‍ॅपमध्ये पिकांऐवजी अंधाराचा फोटो येतो पण पीक पाहणीची नोंद होते.

ऑफीसमध्ये बसून मोबाईल अ‍ॅपमध्ये शेतकर्‍यांच्या शेताचा रेखांश अक्षांश योग्य नसताना पिकांचे फोटो नसताना, शेतात पिके नसताना महसूल व कृषी विभाग असे दोन विभागाचे कर्मचारी आपले मूळ काम सोडून ई पीक पहाणीचे काम करताना दिसत आहेत. तरीही टक्केवारीत वाढ होत नसल्याचे आढळून आल्याने येत्या काळात ई पीक पाहणी अभियानाबाबत महसूल विभागाला पुनर्विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com