द्वारकामाई रस्ता खुला केल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ

द्वारकामाई रस्ता खुला केल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

संचारबंदी काळात साई मंदिराच्या दक्षिण बाजूस भाविकांसाठी बंद असलेल्या शिर्डी नगरपंचायत मालकीचा द्वारकामाई चावडी रस्ता

नगरसेवक सुजित गोंदकर यांच्या मागणीनुसार खुला करण्यात आल्याने काल गुरुवारी साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांना द्वारकामाईच्या दर्शनाचा लाभ घेता आला असून हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याची भावना नगरसेवक सुजित गोंदकर यांनी व्यक्त करत साईसंस्थान प्रशासन तसेच प्रांताधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

सदरील रस्ता खुला करण्यासाठी बुधवार दि. 14 रोजी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे तसेच संस्थानचे अधिकारी यांच्यासह साई मंदिराचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, नगरसेवक सुजित गोंदकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, भाजपचे रवींद्र गोंदकर यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रवेशद्वार क्रमांक चार ते चावडीपर्यंत व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 फूट रस्ता मोकळा करून दुरवरून दर्शन घेण्यासाठी बरिकेट्स काढण्याचे एकमताने ठरले होते.

मात्र काल दुपारी बरिकेट काढले नाहीत म्हणून सुजित गोंदकर यांनी द्वारकामाईसमोर थांबून प्रांताधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून संस्थान प्रभारी सुरक्षा प्रमुख बरिकेट्स काढीत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मेटाकुटीस आलेले वॉर्डाचे नगरसेवक सुजित गोंदकर यांनी टोकाची भूमिका घेत प्रसंगी गुन्हे नोंदवून घेण्याची तयारी दाखवल्याने शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी पोलीस कर्मचारी पाठवून तात्काळ बरिकेट्स काढायला लावले.यासाठी तब्बल एक तास लागला.

योगायोग म्हणजे काल साईबाबांचा महानिर्वाण दिन व बाबांनी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी द्वारकामाईत देह ठेवल्याने बरोबर 2.30 वाजता बरिकेट्स काढण्यात आले. यावेळी हजारो साईभक्तांसह प्रमोद गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे, संस्थान प्रसादालय प्रमुख विष्णूपंत थोरात, पप्पू सुराणा, पराग जैन यांच्यासह बाबांचा जयजयकार करून शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करून बाबांना अभिवादन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com