धुळीच्या साम्राज्यामुळे सोनगावची व्यापारीपेठ हैराण

तब्बल 12 वर्षांपासून रस्त्याचे काम अडले
धुळीच्या साम्राज्यामुळे सोनगावची व्यापारीपेठ हैराण

सोनगाव |वार्ताहर| Songav

राहुरी तालुक्यातील वांबोरीनंतर दुसर्‍या क्रमांकाची मोठी बाजारपेठ असलेल्या सोनगाव पंचक्रोशीच्या मुख्यपेठेतील रस्ता नादुरुस्त झाला आहे. 12 वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. आता हे डांबरीकरण पूर्णत: उखडले असल्याने रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य आहे. यामुळे पेठेतील व्यापारी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी व्यापार्‍यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

सोनगाव पंचक्रोशीतील बाजारपेठ सोनगाव, सात्रळ, धानोरे, हनुमंतगाव, पाथरे या पाच गावांना जोडणारी आहे. पंचक्रोशीची लोकसंख्या 20 हजारांच्या आसपास आहे. या पाचही गावांतील वाड्या, वस्त्या शिवारातील रहिवासी खरेदीसाठी याच पेठेत येतात. त्यामुळे सोनगाव पंचक्रोशीत मोठी वर्दळ असते. जिल्हा परिषदेने बी.ओ.टी. तत्त्वावर उभारलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे नवीन बाजारपेठ सात्रळ मराठी शाळेनजिक उभारली असली तरी किराणा, स्टेशनरी, कापड, हार्डवेअर, हॉस्पिटल, मेडिकल अशी महत्त्वाची दुकाने आणि व्यापारी जुन्या पेठेतच आहेत. त्यामुळे नवी पेठ होऊनही जुन्या पेठेतील गर्दी कमी झालेली नाही. या पेठेतील सात्रळ चौक ते धानोरे घाट हा दोन किलोमीटरचा रस्ता कमालीचा खराब झाला आहे. खड्डे, माती, धुळीमुळे ग्रामस्थ व व्यापारी त्रस्त झाले आहेत.

आता पावसाळा अवघ्या एक महिन्यावर आला आहे. पावसाळ्यात या पेठेतील नादुरुस्त रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल होणार आहे. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन एकाच महिन्यात आधी विखे गटाकडून झाले. नंतर मंत्री तनपुरे यांच्या गटाने बाजारतळावर रस्त्याच्या कामाचा बोर्ड लावला. खासदार किंवा आमदार, कुणीही निधी द्या आणि या रस्त्याचे काम करा, अशी भूमिका पेठेतील व्यापार्‍यांनी घेतली आहे.

पेठेतील रस्त्यावरील धूळ दुकानात येते. या धुळीमुळे दुकानातील माल खराब होतो. दिवसातून चारवेळा व्यापार्‍यांना धूळ झटकावी लागते, दुकान झाडावे लागते. या त्रासापेक्षा अनेक व्यापारी सकाळी सात वाजता दुकान उघडतात. ते रात्री 10 वाजता दुकान बंद करतात. 14 तास जे व्यापारी दुकानाच्या काउंटरला बसतात, त्यांना रस्त्यावरील धुळीने श्वसनाचे विकार सुरू झाले आहेत. तरी संबंधित विभागाने रस्ता तात्काळ दुरुस्त करावा.

- सचिन पांडे, उपाध्यक्ष, सोनगाव व्यापारी असोसिएशन

या रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे. हे काम करताना 10 फुटांऐवजी 20 फुटांचे व्हावे. जेणेकरून पेठेतील रस्ता वाहतुकीसाठी मोठा होईल.

- रमेश पन्हाळे, व्यापारी, सात्रळ.

Related Stories

No stories found.