लॉकडाऊन काळात शिक्षकाने दत्तक घेतली पाच कुटुंब

विजय कारखेले यांनी ठेवला इतरांसमोर आदर्श
लॉकडाऊन काळात शिक्षकाने दत्तक घेतली पाच कुटुंब

करंजी (वार्ताहर) -

राज्य सरकारने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाउन लागू केले आहे. अनेक उद्योगधंदे व कामही बंद पडल्यामुळे शेतमजूर घरकामगार घरातच बसून असल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.

अशातच पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी गावचे सुपुत्र प्राथमिक शिक्षक असलेले विजय कारखेले यांनी गावातील पाच गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन या कुटुंबांना सर्व जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरपोहच करून राज्यातील सर्वच शिक्षकांसमोर एक सामाजिक आदर्श ठेवला आहे.

गरीब व हातावर पोट असलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच दिल्याने त्यांना आता लॉकडाऊनच्या काळात मजुरीसाठी घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही. गरीब गरजू लोक घरीच थांबून राहिले तर करोना त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही व त्यामुळे करोनाचा प्रसारही रोखता येईल व शासकीय यंत्रणेलाही मोठी मदत होईल, या हेतूने माझ्या कुवतीप्रमाणे मी पाच गरीब कुटुंबांना करोना परिस्थिती दूर होईपर्यंत दत्तक घेतले आहे.

त्यांचा मी सांभाळ करणार असल्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कारखेले यांनी म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक गावात शासकीय सेवेत विविध पदांवर अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत तसेच दानशूर व्यक्ती सुद्धा आहेत, अशा कर्मचार्‍यांनी व दानशूर व्यक्तींनी आदर्श शिक्षक कारखेले यांच्या कार्याचा आदर्श घेत गोर गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. शिक्षक कारखेले यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com