Photo Gallery : संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडाल तर जावे लागेल पोलीस ठाण्यात

संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये
Photo Gallery : संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडाल तर जावे लागेल पोलीस ठाण्यात

अहमदनगर|Ahmedagar

वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने संचारबंदी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी विकेंड लॉकडाऊनला नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकलचे दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती. आज सकाळी 7 ते 11 यावेळत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहरामध्ये मोठ्या फौजफाट्यासह संचलन करून बंदचा आढावा घेतला.

दरम्यान जो कोणी विनाकारण फिरत आहे, त्याला आम्ही पोलीस ठाण्यामध्ये आणून फिरण्याचे कारण योग्य नसल्याचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी यावेळी दिली.

शनिवार व रविवार असल्यामुळे विकेंड लॉकडाऊनचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यानुसार रविवारी अधीक्षक पाटील यांनी आपल्या पथकासह शहरातील पाईपलाईनरोड, प्रोफेसर कॉलनी चौक, पत्रकार चौक, भिंगार शहर, माळीवाडा परिसर, कापडबाजार, नवी पेठ, दिल्ली गेट आदी ठिकाणी भेटी दिल्या. घराबाहेर पडणार्‍या लोकांकडे अधीक्षक पाटील यांनी स्वत: विचारणा केली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, भिंगारचे निरीक्षक देशमुख, एमआयडीसीचे निरीक्षक युवराज आठरे, वाहतूक शाखेचे निरीक्षक विकास देवरे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कापर बाजार परिसरात जिल्हाधिकारी डॉ. भोसले या संचलनमध्ये सहभागी झाले. शहरातील लोकांना बंद बाबतचे नवीन नियमावली पोलिसांनी समजावून सांगितली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सकाळी सात ते अकरा यावेळेत वस्तू खरेदी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, नियमांचा वापर केला पाहिज, फक्त मेडिकलच्या संदर्भात मुभा देण्यात आली आहे. विनाकारण कोणीही बाहेर पडू नये, असेे ते म्हणाले. अधीक्षक पाटील म्हणाले, अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडले पाहिजे. त्यांना पोलिसांकडून अडविले जाणार नाही.

परंतू विनाकारण बाहेर पडत असेल तर त्यांना अटकाव केला जाईल. वेळप्रसंगी त्यांना पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. विशेष म्हणजे ते का घराबाहेर पडले, कशासाठी पडले, याचे त्यांना आत्मपरीक्षण मिळावे याकरता आम्ही त्या ठिकाणी समुपदेशन सुद्धा करणार आहोत, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com