
कोपरगाव (प्रतिनिधी) -
ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर युनिट इमारतीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आणून ठेवली
असताना गेल्या वर्षभरापासून विद्यमान आमदारांनी सरकारकडे काहीच पाठपुरावा केला नसल्यामुळे करोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये ट्रामा केअर युनिटची उभारणी करावी म्हणून माझ्या कार्यकाळात मी तत्कालीन आरोग्य मंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा केला होता. शहरालगत असणार्या धार्मिकस्थळे, साईबाबा तपोभूमी तसेच ऐतिहासिक कचेश्वर मंदिर, दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर, संत जनार्दन स्वामी समाधीमंदिर तसेच ओमगुरूदेव जंगलीदास माउली आश्रम, तसेच याच रस्त्यावर काही अंतरावर जागतिक किर्तीचे शिर्डी येथील देवस्थान साईबाबा मंदिर येत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची नेहमी वर्दळ असते. शैक्षणिक संस्था, सहकारी साखर कारखाने व औद्योगिक वसाहत यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने दुर्दैवाने अपघात झाल्यास तातडीने अपघातग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे ट्रामा केअर युनिट व्हावे म्हणून तत्कालीन आरोग्य मंत्री यांचेकडे मागणी केली. सर्व कागदपत्रीय सोपस्कार पूर्ण करत 9 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर यांनी सादर केलेले आहे. आचारसंहितेपूर्वी अंतिम टप्प्यात आलेली ही प्रक्रिया पूर्ण करून ट्रामा केअर युनिट इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विद्यमान आमदारांकडून जनतेच्या जीवन मरणाशी संबंधित असलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे, ही मतदार संघाच्यादृष्टीने दुर्दैवाची बाब आहे, असेही सौ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने नागरिकांना मरण यातना भोगताना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र मतदार संघात निर्माण झाले आहे. - स्नेहलता कोल्हे