दूध दरवाढ धोरणामुळे दूध उत्पादकांचा तोटाच

धोरणात बदल करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अनिल घनवट यांची मागणी
दूध दरवाढ धोरणामुळे दूध उत्पादकांचा तोटाच

श्रीगोंदा । प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दूध दरवाढीमुळे दूध उत्पादकांचा फायदा होण्या ऐवजी तोटाच होत आहे. शासनाने नवीन दूध दर धोरणात बदल करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दुग्धविकास मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांची मागणी लक्षात घेईन दूध दरात वाढ केली आहे. ३.५ फॅट व ८.५ एस एन एफ प्रतीच्या दुधाला ३२/- रुपये दर मिळत होता त्या ऐवजी ३४/- रुपये दर जाहीर केला आहे. प्रथमदर्शनी ही दोन रूपये प्रती लिटर दर वाढ दिसते परंतु प्रत्यक्षात दूध उत्पादकांना पूर्वी पेक्षा कमी दर मिळत असल्याच्या तक्रारी दूध उत्पादक करत आहेत. मागील धोरणात ३२/- रुपये दर असताना एस एन एफ ८.५ ऐवजी ८.४ असला, म्हणजे एक पॉईंट कमी तर ३० पैसे कमी मिळत असत . आता ३४/- रुपये प्रती लिटरच्या धोरणात जर एस एन एफ ८.४ असला तर थेट एक रुपयेच कमी मिळत आहे. तसे सरकारच्या तक्त्यात म्हटले आहे व त्यानुसार दुध संकलन केंद्रांकडून दूध उत्पादकांना पेमेंट केले जात आहे. प्रत्येक कमी पॉईंटला एक रुपया कमी होत असल्यामुळे ३२ रुपये दर असताना जितके पैसे मिळत होते त्यापेक्षा ही कमी पैसे दूध उत्पादकांच्या हातात पडत आहेत.

खाजगी दूध संघ याचा गैर फायदा घेत असल्याचे तक्रारी शेतकरी करत आहेत. दुधाचे फॅट मापक मशिनचे कालिब्रेशन तहसीलदारांने करायचे असते ते केले जात नाही. तसेच वजनात सुद्धा चोरी होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. दूध उत्पादकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नवीन दरवाढ धोरणात सुधारणा करावी व फॅट चोरी व काटामारी करणाऱ्यां वर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथके नेमवित अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com