चितळी पोलीस दूरक्षेत्र करोनाच्या मुळावर

अवैध दारू विक्रीमुळे होणार्‍या गर्दीतून अनेकांना करोना महामारीची बाधा
चितळी पोलीस दूरक्षेत्र करोनाच्या मुळावर
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून चितळी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

दरम्यान येथील अवैध दारू व मटका विक्रेत्यांना पोलिसांचे अभय असल्याने अवैध धंदा खुलेआम सुरू आहे. येथूनच करोनाची अनेकांना बाधा झाल्याने चितळी पोलीस दूरक्षेत्र करोनाच्या मुळावर असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली.

राहाता तालुक्यातील चितळी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर चितळी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने गावात औषध फवारणी करण्यात आली. करोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी करून घेण्यासाठी दोन वेळेस गावात विशेष तपासणी शिबिरे घेण्यात आली.

तसेच वाकडी, पुणतांबा, जळगाव येथेही होणार्‍या तपासणी शिबिरात चितळीचे नागरिक सहभागी होऊन तपासणी करीत आहेत. नागरिकांकडून लॉकडाऊनचे नियम पाळले जातात. परंतु अवैध व्यवसाय करणार्‍यांकडून सर्वच नियम धाब्यावर बसवून खुलेआम दारू विक्री सुरू असल्याने तेथे होणार्‍या गर्दीमुळे करोनाची साखळी तोडण्यात ग्रामपंचायतीला अडसर निर्माण होत आहे.

चितळी स्टेशन व गाव परिसरात खुलेआम ग्राहकांना घरपोहच दारू विक्री करणार्‍या अवैध दारू विक्रेत्यांना याबाबत छेडले असता, आम्ही पोलिसांना हप्ते कशाचे देतो? असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे सुज्ञ नागरिकांची पाचावर धारण बसली असून अवैध दारू विक्रेत्यांनी पोलीस विभागाला थेट आव्हान दिले आहे.

चितळी परिसरात गेल्या पंधरा दिवसांत 228 रुग्ण बाधित निघाले आहेत. त्यातील 152 उपचार घेत असून 5 मृत्यू झाले आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी चितळी ग्रामपंचायत सर्व प्रयत्न करीत आहे. गावातील औषध फवारणीसह घराघरांत जाऊन रुग्णांची लक्षणे तपासणार असल्याचे वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घोगरे यांनी सांगितले.

चितळी परिसरातील करोनाची साखळी तोडण्यासाठी येथील जॉन (सत्यम) डिस्टलरीने पुढाकार घेतला आहे. कंपनीचे मालक शाम चूग यांनी सरपंचांंना फोन करून मदत देण्याची तयारी दाखविली. नागरिकांना मोफत सॅनिटायझर, सी. व्हिटॅमीन गोळ्या व लसीकरणासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.

चितळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत जाऊन सर्व अवैध व्यावसायिकांना लॉकडाऊन काळात दारू विक्री बंद करण्याची विनंती केली. परंतु त्यांना कुणाचे अभय आहे ते कळत नाही. त्यांचेवर कडक कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे लोकनियुक्त सरपंच दीपाली वाघ यांनी सांगितले.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या चितळी येथील अवैध दारू विक्रीबाबत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना विचारले असता, माझ्या कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद आहे. चितळीत कोणी दारू विक्री करीत असेल तर तात्काळ कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. परंतु पाच दिवस झाले तरी कोणताही परिणाम नाही हे विशेष.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com