पूल तुटल्यामुळे शीवरस्त्याची वाहतूक विस्कळीत

पूल तुटल्यामुळे शीवरस्त्याची वाहतूक विस्कळीत

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा-जळगाव या अंदाजे तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर येथील गणेश बंधार्‍याच्या जवळ असलेल्या पुलाचा काही भाग तुटल्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मोटरसायकल स्वारांना एका बाजूने जात येत असले तरी ट्रॅक्टर, टेंपो यासारख्या चारचाकी वाहनांना जाता येत नसल्यामुळे शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. पुणतांबा-जळगाव शीव रस्ता ब्रिटीश कालापासून असून या रस्त्यावर तीन ठिकाणी पूल आहेत. त्यापैकी हा एक नंबरचा पूल मात्र तुटला आहे. त्या ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे.

शासनाच्या नकाशावर हा रस्ता 66 फूट रुंदीचा आहे. मात्र जळगाव व पुणतांबा या दोन्ही गावाच्या हद्दीतील लगतच्या शेतकर्‍यांनी रस्त्यावर अतिक्रमणे केल्यामुळे बर्‍याच ठिकाणी हा रस्ता अवघा 6 फूट इतका अरुंद झालेला आहे. रस्त्याच्या पूर्व बाजूला काही अंतरापर्यंत अतिक्रमण काढलेले आहे. मात्र तुटलेल्या पुलापासून वाकडी रोडपर्यंत अतिक्रमणे जैसे थे आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच वेड्या बाभळीच्या झाडांनी रस्ता व्यापलेला आहे. रस्त्याची दुरुस्ती व अतिक्रमणे काढण्याबाबत ग्रामस्थांना तहसीलदार राहाता यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. टिळेकर वस्तीपासून वाकडी रोडपर्यंत असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती करून त्याचे रुंदीकरण करण्याची गरज आहे.

मध्यंतरी या रस्त्याच्या वापर करणार्‍या काही शेतकर्‍यांनी स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकला होता. मात्र पावसामुळे रस्ता पुन्हा खराब झाला आहे. या स्त्याबरोबरच परिसरातील बहुतांशी इतर रस्त्याचीही अवस्था दयनीय झाली आहे. लोकप्रतिनिधी आ. आशुतोष काळे यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून आपल्या विकास निधीतून तातडीने या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्गाने केली आहे.

Related Stories

No stories found.