सहा दिवसांच्या टाळेबंदी नंतर दूधगंगा पतसंस्था पुन्हा सुरू

ठेवीदारांची मोठी गर्दी, ठेवीदार व कर्जदारांसाठी नियमावली जारी
सहा दिवसांच्या टाळेबंदी नंतर दूधगंगा पतसंस्था पुन्हा सुरू

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

आर्थिक अपहारामुळे अडचणीत सापडलेली व गेल्या सहा दिवसांपासून बंद असलेली येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अखेर कालपासून सुरू करण्यात आली आहे. पतसंस्था सुरू झाल्याने ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पतसंस्थेने ठेवीदार व कर्जदारांसाठी नियमावली जाहीर केली असून या नियमावलीनुसार संस्थेचे व्यवहार होणार आहेत. मोजकेच पैसे मिळत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला.

दूधगंगा पतसंस्थेमध्ये मोठा आर्थिक अपहार झाल्याची चर्चा सुरू असतानाच अचानक या पतसंस्थेला टाळे लावण्यात आले होते. यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी पतसंस्था बंद ठेवल्यामागचे कारण विषद केले होते. संस्थेचे व्यवस्थापक व इतर कर्मचार्‍यांनी आर्थिक अपहार केल्याची तक्रार त्यांनी संबंधित खात्याकडे केली होती यानंतर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दूधगंगा पतसंस्थेचे 2016 ते 2021 या कालावधीचे फेर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार फेर ऑडिटचे काम सुरूही करण्यात आलेले आहे. या कामासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संस्थेमध्ये किती रुपयांचा अपहार झाला व कोणी केला याचा खुलासा होणार आहे.

दरम्यान रविवारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पतसंस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ठेवीदार व कर्जदारांसाठी नियमावली ठरविण्यात आली.

काल सकाळीच पतसंस्थेच्या प्रवेशद्वारावर नियमावलीचा फलक लावण्यात आला. मुदत ठेव पावत्यांची मुदत संपल्याशिवाय कोणत्याही प्रकारची रक्कम मिळणार नाही, मुदत ठेव पावत्यांची मुदत संपल्यानंतर त्या सेव्हिंग खात्यावर वर्ग करण्यात येतील तसेच रकमेच्या 10% प्रमाणे आठवड्यातून एकदाच रक्कम अदा केली जाईल, ज्या मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली नाही त्या ठेविदारांच्या पावत्या मुदतपूर्व बंद केल्या जाणार नाही, सभासदांचे सेव्हिंग खात्यावर जमा असलेल्या रकमेपैकी पाच हजार रुपयांची रक्कम आठवड्यातून एकदाच अदा केली जाईल.

डेली ठेव खाते मुदतीनंतर बंद केले जाईल व त्यांनाही रक्कम आठवड्यातून 5 हजार रुपये प्रमाणे दिले जातील, कॅश क्रेडीट कर्ज, मुदत ठेव कर्ज व इतर कर्ज यांना कोणत्याही प्रकारची रक्कम अदा केली जाणार नाही. लॉकरची सुविधा चालू राहील, जस जशी संस्था पूर्ववत स्थितीत येईल त्याप्रमाणे नियमांत बदल केले जातील व त्यानुसार सर्व व्यवहार पुर्वीप्रमाणे सुरळित होतील, अशी नियमावली ठरविण्यात आली आहे. पतसंस्था सुरू झाल्याने ठेवीदारांनी सकाळीच मोठी गर्दी केली होती.

पतसंस्थेमध्ये गदारोळ होऊ नये यासाठी संस्थेचे अध्यक्ष सकाळीच पतसंस्थेत हजर राहिले होते. पतसंस्थेच्या नियमावलीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनिश्चित काळापर्यंत ठेवी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ठेविदाराने चांगलीच नाराजी व्यक्त केली. मात्र संस्थेचे अध्यक्ष यांनी ठेवीदारांसोबत चर्चा केली दुपारनंतर ठेवीदारांची गर्दी कमी झाली होती मात्र अध्यक्ष बसून होते. अनेक ठेवीदारांनी पैशाचे वेगवेगळे नियोजन केले होते. मात्र ही रक्कम त्यांना लगेच मिळणार नसल्याने त्यांचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे पतसंस्थेबाहेर ते प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसत होते.

पतसंस्थेत मोठ्या घडामोडी घडणार ?

दूधगंगा पतसंस्थेमध्ये झालेल्या आर्थिक अपहाराची तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. संचालक मंडळापैकी एका संचालकाने काही महिन्यांपूर्वीच राजीनामा दिल्याचे वृत्त आहे, त्याने आपला राजीनामा का दिला व हा राजीनामा का स्वीकारला गेला नाही याची चर्चा सुरू असतानाच आर्थिक अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या आर्थिक अपहारामध्ये नेमका कोणाचा सहभाग आहे, याबाबतही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्थेमध्ये आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com