अफवांवर विश्वास ठेवू नये - भाऊसाहेब कुटे

कर्जदारांनी कर्ज भरावे, संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम
अफवांवर विश्वास ठेवू नये - भाऊसाहेब कुटे

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक गैर व्यवहाराबाबत संचालक मंडळाने लोकल ऑडिट करुन चौकशी केली असता गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे अहवालात दोषी असलेल्या व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा निबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांचेकडे लेखी तक्रार करुन आर्थिक अपहार करणारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आाहे.

सभासद, ठेवीदारांनी विचलित न होता संस्थेवर विश्वास ठेवावा. कर्जदारांनी कर्जाची रक्कम भरावी, कर्ज न भरणार्‍यांवर लिलाव व जप्तीची कारवाई करुन कर्जाची रक्कम वसुल केली जाईल, त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या जातील असा विश्वास संचालक मंडळाच्यावतीने दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.

श्री. कुटे यांनी पत्रकात म्हटले आहे की, सहकारी क्षेत्रात अनेक वर्षापासून आपली संस्था आर्थिक प्रगतीवर आहे. या संस्थेत दूध उत्पादक शेतकरी व छोटेमोठे व्यापारी व सर्व घटक यांच्यासह चार हजार सभासद आहेत. या संस्थेची स्थापना शेतकरी वर्गाला शेती व जोडधंदा म्हणून दूध उत्पादन व छोटेमोठे व्यवसाय करण्याच्या उद्देशाने स्थापना केलेली आहे. याच उद्देशाने आत्तापर्यंत संस्थेची वाटचाल चालू आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी जमा होत्या. त्यामधून मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्यात आले आहे.

संस्था सुस्थितीत चालू होती. संस्थेमध्ये अपहार झाल्याची चर्चा सुरु झाल्याने ठेवीदारांची मानसिकता बिघडली. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी काढण्यास सुरुवात केली. संस्थेमध्ये असलेल्या शिल्लक रकमेतून ठेवीदारांना देणे दिले आहे. तरीही अफवाही कमी झाल्या नाही उलट ठेवी काढण्याचे प्रमाणात वाढ झाली. पर्यायाने संस्थेकडे शिल्लक रकमेची कमतरता आली. वास्तविक पाहता अपहाराची रक्कम कमी असल्यामुळे याचा संस्थेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु अफवा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे लोकांमध्ये चलबिचल झाली. तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, विश्वासाला कोणत्याही परिस्थितीत तडा जाऊ दिला जाणार नाही.

संस्थेने सभासदांना मोठ्या प्रमाणावर तारणी कर्ज दिले आहे, त्या कर्जाची थकबाकी काही प्रमाणात चालु थकबाकी आहे. काही कर्जदारांचे खाते नियमीत चालू आहे. कर्जदारांना संस्थेने कर्ज देऊन मदत केलेली आहे. याची जाणीव ठेवून संस्थेच्या अडचणीच्या काळात सर्वच कर्ज वेळेवर व लवकरात लवकर भरण्याचे सहकार्य करावे व संस्थेच्या ऋृणातून उतराई व्हावे. जे कर्ज भरणार नाही त्यांच्यावर कलम 101 व कलम 91 नुसार स्थावर जंगम मालमत्तेचा लिलाव व जप्ती करुन कर्जाची वसुली केली जाईल, कोणत्याही परिस्थितीत संस्थेला काहीही झाले तरी कर्ज बुडणार नाही तरी अफवांवर विश्वास ठेवून कर्ज भरण्याचे टाळू नये, तरी सर्व कर्जदारांनी कर्ज भरावे, असे आवाहन संचालक मंडळाच्यावतीने दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com