दूधगंगा पतसंस्था सोमवारपासून पुन्हा सुरु होणार

गोपनीय बैठकीत ठरली पुढील निती
दूधगंगा पतसंस्था सोमवारपासून पुन्हा सुरु होणार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

आर्थिक अपहारावरून वादग्रस्त ठरलेली व गेल्या पाच दिवसापासून बंद असलेली येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था आज सोमवारपासून पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे. काल सकाळी संचालक मंडळाच्या गोपनीय बैठकीत पतसंस्था व सर्व शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेवीदारांबाबत पुढील दिशाही या बैठकीत ठरविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.

दूधगंगा पतसंस्था सोमवारपासून पुन्हा सुरु होणार
अफवांवर विश्वास ठेवू नये - भाऊसाहेब कुटे

आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या दूधगंगा पतसंस्थेला बुधवारी अचानक टाळे लावण्यात आले होते. या पतसंस्थेमध्ये मोठा अपहार झाल्याचे वृत्त वार्यासारखे पसरले यामुळे अनेक ठेवीदारांनी पतसंस्था कार्यालयासमोर गर्दी करण्यास सुरुवात केली. यानंतर दुसर्या दिवशी संचालक मंडळाच्या वतीने पतसंस्थेच्या प्रवेशद्वारावर फलक लावून पतसंस्था बंद ठेवण्याचे कारण स्पष्ट केले होते. पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी संबंधित खात्याच्या अधिकार्यांकडे पतसंस्थेत अपहार झाला असल्याबाबतचा तक्रार अर्ज दिला. पतसंस्थेचे व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ व इतर कर्मचार्यांनी हा अपहर केल्याचे त्यांनी या अर्जात म्हटलेले आहे. यानंतर संबंधित खात्याने त्वरित पावले उचलत पतसंस्थेचे मागील पाच वर्षांचे फेर ऑडिट करण्याचे आदेश दिले.

दूधगंगा पतसंस्था सोमवारपासून पुन्हा सुरु होणार
पुतण्याचे चुलत्यावर ब्लेडने वार

दरम्यान पतसंस्था बंद असल्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. ठेवीदारांमधून पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. या पतसंस्थेवर अध्यक्षांचे पूर्ण नियंत्रण असतानाही कर्मचार्यांनी आर्थिक अपहर केलाच कसा असा सवाल आता ठेवीदार व सभासदांमधून विचारला जात आहे. या पतसंस्थेमध्ये नेमका किती रुपयांचा अपहार झाला व या अपहारामध्ये कुणाकुणाची भागीदारी आहे याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. या पतसंस्थेचे 2016 ते 2021 या पाच वर्षांच्या कालावधीचे फेर ऑडिट होणार असल्याने यानंतर किती रुपयांचा अपहार झाला हे स्पष्ट होणार आहे.

समजलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून या अपहाराची दबकी चर्चा होत होती. ही चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यानंतर ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली होती. पतसंस्थेने अनेकांच्या ठेवी दिल्या. मात्र ठेवीदारांची गर्दी वाढत चालल्याने व पतसंस्थेतील रोख रक्कम संपल्याने पतसंस्थेला टाळे लावण्यात आल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी पतसंस्थेच्या एका पदाधिकार्याने व एका कर्मचार्याने आपली खाजगी मालमत्ता विकल्याचे वृत्त आहे. ही मालमत्ता त्यांनी का विकली याबाबतही उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी शनिवारी प्रसिद्धी माध्यमांकडे खुलासा केला पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम असून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले होते. यानंतर पतसंस्थेकडून पुढे हालचाली सुरू झाल्या. काल रविवारी सकाळी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची व प्रमुख कर्मचार्यांची बैठक घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या बैठकीत सोमवारपासून पतसंस्था पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ठेवीदारांबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

पतसंस्था सुरू झाल्यानंतर ठेवीदारांची गर्दी होणार आहे हे गृहीत धरून ठेवीदारांचे समाधान कसे करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची पूर्ण रक्कम देण्याऐवजी दर आठवड्यात ठराविक रक्कम देण्यात येणार आहे. पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर ठेवीदारांची सर्व रक्कम देण्यात येण्याची शक्यता आहे. कर्जदारांबाबतही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. कर्ज वसुली बाबत कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे माहिती समजली आहे.

प्रशासकाची नियुक्ती होऊ शकते

दूधगंगा पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा असल्याने या पतसंस्थेवर जिल्हा उपनिबंधकांचे नियंत्रण आहे. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याशी संपर्क साधला असता या पतसंस्थेचे फेर ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत असे त्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यामध्ये फेर ऑडिट पूर्ण होईल. यामध्ये वस्तू स्थिती समोर येईल. यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. पतसंस्थेत मोठा आर्थिक अपहार झाल्याचे उघडकीस आले तर प्रशासकाची नियुक्ती ही होऊ शकते, असे श्री. पुरी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com