दूधगंगा पतसंस्थेतील अपहारप्रकरणी गुन्हा दाखल होणार

जिल्हा उपनिबंधकांकडून विशेष लेखापरीक्षकांना परवानगी
fraud
fraud

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी जबाबदार असणार्‍या सर्व व्यक्तींच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी जिल्हा उपनिबंधकांनी विशेष लेखापरीक्षकांना दिली आहे. संबंधित व्यक्तींविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी सूचना देण्यात आल्याने दोन दिवसात अपहार करणार्‍या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

दूधगंगा पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून ही पतसंस्था चर्चेत आहे. दीड वर्षांपूर्वी या पतसंस्थेला अचानक कुलूप लावण्यात आल्याने पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाल्याची चर्चा सभासदांमधून सुरू झाली. यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी पतसंस्थेमधील काही कर्मचार्‍यांनी आर्थिक अपहार केल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याचे जाहीर केले होते. याबाबत अध्यक्षांनी शहर पोलीस व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेऊन पतसंस्थेचे पाच वर्षांचे फेर लेखापरीक्षण करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक पुरी यांनी सांगितले होते. या कामासाठी विशेष लेखापरीक्षा निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. निकम यांनी या पतसंस्थेच्या सन 2016 ते 2021 या पाच वर्षांच्या कालावधीचे फेरलेखा परीक्षण केले. याबाबतचा अहवाल त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला. यानंतर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी विशेष लेखा परीक्षकांना तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी परवानगी दिली आहे.

या पतसंस्थेमध्ये 98 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. यानंतर पतसंस्थेचे संचालक यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. सर्व संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे आपले म्हणणे मांडले आहे. पतसंस्थेमधील आर्थिक अपहाराशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले होते. पतसंस्थेचे व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ व इतर 16 जणांनी आर्थिक अपहरण केल्याची तक्रार पतसंस्थेच्या अध्यक्षांनी पोलिसांकडे याच महिन्यात केली होती.

अपहार करणार्‍यांची नावे गुलदस्त्यात

दूधगंगा पतसंस्थेत झालेल्या आर्थिक अपहरण प्रकरणी जबाबदारी सर्व जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी जिल्हा उपनिबंधकांनी विशेष लेखापरीक्षकांना दिली आहे. यामुळे विशेष लेखापरीक्षक कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करतात याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे. विशेष लेखापरीक्षक आर. एफ. निकम यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. यामुळे अनेकांची धांदल उडालेली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com