दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार प्रकरण : संतप्त ठेवीदारांचे आंदोलन सुरु

दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार प्रकरण : संतप्त ठेवीदारांचे आंदोलन सुरु

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

येथील दूधगंगा नागरी पतसंस्थेतील 81 कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही त्याला अटक न झाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी काल सकाळपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत जन आक्रोश व उपोषण सुरू केले आहे. ठेवीदारांच्या संतापामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह 21 जणांविरोधात विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतरही मुख्य सूत्रधार पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे व त्याच्या कुटुंबियांना अद्याप अटक न झाल्याने ठेवीदारांमधून संताप व्यक्त होत आहे.

मुख्य सूत्रधारासह इतर आरोपींना अटक करावी, ठेवीदारांचे पैसे मिळावे आदी मागण्यासाठी दूधगंगा नागरी पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीने शनिवारी सकाळी नऊ वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन व उपोषण सुरू केले. या आंदोलनाला अनेकांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

या आंदोलनामध्ये ठेवीदार संघर्ष समितीचे मोहन लांडगे, प्रकाश गुंजाळ, प्रभाकर रहाणे, हेमंत पवार, अनिल जोंधळे, पोपट आगलावे यांच्यासह सुमारे 100 ठेवीदार संख्येने सहभागी झाले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com