दूधगंगा पतसंस्था आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सूत्रधारांसह सर्व आरोपींना त्वरित अटक करा

खासदार लोखंडे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार || अधिकार्‍यांना धरले धारेवर
दूधगंगा पतसंस्था आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
सूत्रधारांसह सर्व आरोपींना त्वरित अटक करा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख सूत्रधार पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे व इतर आरोपींना अटक न झाल्याने खासदार सदाशिव लोखंडे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना चांगले धारेवर धरले. या आरोपींना त्वरीत अटक करा, असे आदेश त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिले. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी ठेवीदारांनी दिला.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 81 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे फेर लेखापरीक्षणात उघड झाले होते. यानंतर जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी पतसंस्थेचा अध्यक्ष व घोटाळ्याचा मास्टर माईंड भाऊसाहेब कुटे याच्यासह 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब कुटे व त्याच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळून अनेक दिवसांचा कालावधी उलटलेला असतानाही या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यामुळे पतसंस्थेचे सभासद व ठेवीदार संतप्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर गैरव्यवहारातील सर्व आरोपींना अटक करावी व ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी दूधगंगा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत जन आक्रोश व उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचा दुसर्‍या दिवशी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.

या आर्थिक अपहारातील मुख्य सूत्रधार पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे व त्याचे कुटुंबीय ठिकठिकाणी फिरताना अनेकांनी पाहिले आहे, असे असतानाही त्याला अटक होत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. पोलीस त्याला अटक का करीत नाही ? असा संतप्त सवाल यावेळी ठेवीदारांनी उपस्थित केला. दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवराबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असून या अपहरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी ,अशी मागणी करणार असल्याचे लोखंडे यांनी यावेळी सांगितले.

प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी यावेळी अधिकार्‍यांना चांगले धारेवर घेतले. मुख्य सूत्रधार हा पोलिसांना का सापडत नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. पोलीस त्याला जाणीवपूर्वक अटक करीत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद सूर्यवंशी, शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे, तालुकाध्यक्ष रमेश काळे, छावा संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ वाघ, दूधगंगा पतसंस्थेचे प्रशासक अमोल वाघमारे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक कमलाकर जाधव, गुन्हे शाखा यांच्यासह ठेवीदार मोहन लांडगे, प्रकाश गुंजाळ प्रभाकर राहणे, मोरेश्वर जगताप, मिना हासे, हेमंत पवार, सुरेश मोरे, राजेंद्र अनाप, सिताराम सातपुते, अशोक मेहेर, एस. टी. देशमुख, पोपट आगलावे, प्रकाश गुंजाळ, प्रकाश मुंदडा, भिमाबाई कोल्हे, चंद्रभान लांडगे, शिवाजी गुंजाळ आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com