दुबईतील जानी विश्वनाथन यांची बीज बँकेला भेट

दुबईतील जानी विश्वनाथन यांची बीज बँकेला भेट

अकोले |प्रतिनिधी| Akole

जगभरात प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री बीजमाता राहिबाई सोमा पोपेरे यांच्या पुढाकाराने व बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती गावरान बियांच्या बँकेला नुकतीच हीलिंग लाइव्हसच्या संस्थापक जानी विश्वनाथन- यांनी नुकतीच भेट दिली.

या भागात निर्माण होणारे अस्सल गावरान व देशी वाणांचा प्रसार देशातील इतर राज्यांमध्ये कसा करता येईल हा या भेटीमागील प्रमुख उद्देश होता. भेटीदरम्यान त्यांनी पारंपरिक देशी बियाणे संवर्धन प्रक्रिया समजून घेतली. पारंपरिक पद्धतीने संवर्धन करण्यात आलेल्या विविध पिकांच्या वाणांचा अभ्यास त्यांनी केला. पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी त्यांना संपूर्ण कामाची माहिती प्रत्यक्ष शेतात जाऊन दिली. पारंपरिक वाणांची शेती व त्यातील राहीबाई यांचे ज्ञान पाहून त्या आश्चर्यचकीत झाल्या. शेकडो वर्षांपासून व पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आलेल्या अस्सल देशी वाणांचा साठा बघून त्यांच्यासोबत आलेली अभ्यास करणारी सर्व टीम थक्क झाली.

याप्रसंगी त्यांनी शेतकर्‍यांच्या अडचणीही समजून घेतल्या. या भागात पर्जन्यमान चांगले असतानाही उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासते. खरीप हंगाम संपला की बियाणे निर्मितीचे काम थंडावते. बदलत्या हवामानाचा मोठ्या प्रमाणावर फटका बीज निर्मितीला होत आहे. अजूनही यांत्रिक शेती या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होत नाही त्यामुळे उत्पादन खर्च दुप्पट होतो. मोठ्या प्रमाणात मजूर शेती कामासाठी लागतात. वेळेत शेती कामे न उरकल्यास त्याचा फटका उत्पादनाला बसतो. सर्व अडचणींची माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी उपस्थित मान्यवरांना करून दिली. या भेटीनंतर जानी विश्वनाथन यांनी बायफ संस्थेने महिलांसोबत उभे केलेले कार्य दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काढले. या भागातील आदिवासी स्त्रियांसाठी हीलिंग लाईव्हस संस्था भरीव कार्य करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत हीलिंग लाईव्हस महाराष्ट्र प्रमुख संतोष सांबरे, कृषी तज्ञ स्वप्निल फलके, सुनील पडवळ, सॉफ्टवेअर इंजि. अमृता फलके, कृषी तज्ञ पृथ्वीराज सांबरे, एकनाथ सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com