
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
शहर व तालुक्यात थर्टी फस्ट उत्साहात साजरा होत असताना यात एक पोलीसही मागे नव्हता. या पोलिसाने चक्क ऑन ड्युटी थर्टी फस्ट साजरा केला. मद्य प्राशन करून हा पोलीस शहरातील नेहरू चौकात रात्रीची गस्त घालत होता. मद्यधुंद अवस्थेत त्याचेेेे कारनामेे अनेकांनी अनुभवले. याची माहिती समजल्याने इतर पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांंनी या मद्यधुंद पोलिसाला घरी काढून दिले.
शहरातील नेहरू चौकामध्ये काल रात्री या पोलिसाची ड्युटी लावण्यात आलेली होती. मद्य प्राशन करून तो ड्युटीवर आलेला होता. या पोलिसाला उभेही राहता येत नव्हते. धडपडत तो नेहरू चौकात इकडे तिकडे फिरत होता. यावेळी या पोलिसांनी काही नागरिकांना शिवीगाळही केली. या पोलिसाचे कारनामे अनेकजण पाहत होते.
दरम्यान नेहरू चौकातील दोन परिवारामध्ये वाद झाल्याने हा वाद सोडवण्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी मध्यरात्री नेहरू चौकात पोहोचले. यावेळी आपला एक सहकारी दारू पिलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या पोलिसाला घरी काढून दिले. दरम्यान या पोलिसाबाबत काही जागृत नागरिकांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली. पोलीस अधिकारी या कर्मचार्यावर कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
वैद्यकीय चाचणीच्या मागणीकडे दुर्लक्ष
या मद्यपी पोलिसाने दारू पिलेल्या अवस्थेत नेहरू चौकात गदारोळ केला होता. नेहरू चौकामध्ये रात्री पोलीस कर्मचार्यांसह आलेल्या एका पोलीस अधिकार्याकडे नागरिकांनी या पोलिसाबाबत तक्रारी केल्या. या पोलीस कर्मचार्याची वैद्यकीय चाचणी करावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र उपस्थित पोलीस अधिकार्याने याकडे दुर्लक्ष करून संबंधित पोलीस कर्मचार्याला घरी पाठवून दिले. या अधिकार्याने संबंधित कर्मचार्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे कुठलाही अहवाल पाठवला नाही आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या कर्मचार्यावर कोणती कारवाई करणार? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.