इंदोरी (वार्ताहर) -

कोल्हार - घोटी रस्त्याचे काम करणार्या कंपनीच्या डंपरने शाळेतून स्कुटीवरून घरी चाललेल्या शिक्षिका व तिच्या मुलीला जोराची

धडक दिली. यात दुचाकीवरील महिला शिक्षिका व तिची मुलगी गंभीर जखमी झाली असून संबंधित डंपर चालक गाडी सोडून अपघात स्थळावरून पसार झाला. कोल्हार- घोटी राज्यमार्गाचे काम सध्या मागील अपघातापासून मंदगतीने सुरू आहे.

मात्र, ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग अत्यंत बेफिकिरीने या कामाच्या बाबतीत वागत आहेत. अनेक ठिकाणी अपूर्ण असलेल्या कामामुळे अपघात घडण्याचे प्रकार वारंवार वाढले असून नागरिकांच्या जिवाशी ठेकेदाराचा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा खेळ सुरुच असल्याचे वास्तवदर्शी चित्र सध्या अकोले तालुक्यात कोल्हार- घोटी राज्यमार्गावर दिसत आहे.

गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास रूंभोडी शिवारातील लोहटेवाडी येथे या राज्यमार्गावर भीषण अपघात घडला. या अपघातात न्यू इंग्लिश मिडियम शाळेतील शिक्षिका वैशाली नवले व त्यांची मुलगी अवंतिका नवले शाळा सुटल्यानंतर गाडीवरून घरी जात असताना राजूरच्या दिशेने जाणार्या डंपरने हॉटेल ईशान जवळ जोराची धडक दिली.

त्यात शिक्षिका व त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातस्थळी शेजारील नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने अकोल्यातील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. संबंधित डंपरचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटना घडल्यानंतर आपघात स्थळावरून संबंधित ड्रायव्हरने पळ काढला, पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.