औषध कंपन्या रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात कुचराई का करतात ?

औषध कंपन्या रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात कुचराई का करतात ?

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणार्‍या आणि करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डीतील साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था प्रत्येक वर्षाला साईनाथ रुग्णालय तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी करोडो रुपयांचे औषधे खरेदी करतात.

साईबाबांना भरभरून दान देण्यासाठी दिग्गजांची या ठिकाणी रांगा लागतात. असे असताना ज्या औषध कंपन्यांना करोडो रुपयांचा बिझनेस संस्थानकडून मिळतो. अशा औषध कंपन्या करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत रेमडीसिवर इंजेक्शन देण्यासाठी कुचराई का करत आहे? असा प्रश्न शिर्डीसह जिल्ह्यातील साईभक्तांना पडला आहे.

देशातील नंबर 2 चे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात कोट्यवधीचे दान देण्यासाठी लहान-मोठे यासह उद्योजक पुढे येतात याची आजतागायत संस्थांच्या इतिहासात नोंद देखील आहे. जिल्ह्यातील लक्ष वेधून असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या कोव्हिड सेंटरमध्ये करोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण भरती होत आहे. या ठिकाणी ऑक्सिजन बरोबरच रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे तसेच नातेवाईकांचे अतोनात हाल होत असताना दिसून येत आहे. रुग्ण अक्षरशः डोळ्यासमोर इंजेक्शन मिळत नसल्याने तडफडून मरत आहे. तसे पाहिले तर साईबाबा विश्वस्त व्यवस्थेकडून साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय व साईनाथ रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांंसाठी विविध फार्मासिटीकल कंपन्याकडून करोडो रूपयांचे औषध खरेदी करत असतात.

करोना आजारासाठी उपयुक्त ठरलेल्या एकमेव रेमडीसीवीर इंजेक्शन बनविणार्‍या औषध कंपन्या अशा परिस्थितीत साईबाबा संस्थानला हे इंजेक्शनचा पुरवठा का करत नाही? जर असे असेल तर त्या कंपन्यांकडून संस्थानने औषधे खरेदी करण्याचे टाळायला हवे. यामध्ये राजकारण होते का? साईबाबांच्या रूग्णसेवेला हरताळ फासण्याचे काम नेमकं कोण करत आहे. साई संस्थानला ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठी कोणताही फायदा नसताना रिलायन्स सारखा उद्योगसमूह पुढाकार घेऊन प्लांट उभारून देत आहे तर रेमडीसिवीर इंजेक्शन देण्यासाठी संस्थानकडून कोट्यवधी रुपयांचे बिझनेस मिळवणार्‍या फार्मासिटिकल कंपन्या इंजेक्शन देण्यासाठी टाळाटाळ का करत आहे. यामागे काही षडयंत्र आहे का ? हे मात्र कळायला कारण नाही.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सत्ताधारी नेत्यांनी कोव्हिड सेंटरचे बेड वाढवून देण्यासाठी आदेश दिले. मात्र या ठिकाणी त्याप्रमाणात ऑक्सिजन, डॉक्टर, नर्सेस, स्टाफ तसेच औषधे यांची व्यवस्था का केली नाही. कोव्हिडची दुसरी लाट अतिशय भयानक असून संस्थानच्या साई आश्रम फेज 2 आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णांना आज बेड शिल्लक राहिले नाही. संस्थानच्या कोव्हिड सेंटरमध्ये फ्री उपचार असल्याने जो तो राजकीय नेता संस्थानच्या अधिकार्‍यांना दबाव आणून अ‍ॅडमिट करण्यासाठी भाग पाडत आहे. संस्थानचे अधिकारी मात्र कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहे. प्रत्यक्षात येथे किती जणांचा जीव जातो याकडे कोणी लक्ष घालायला तयार नाही. दोन्ही रुग्णालयांसाठी गोळ्या-औषधे पर्चेसिंग विभागातील अधिकारी अशा परिस्थितीत डोळ्यावर पट्टी लावून बसले आहे का असा प्रश्न शिर्डी करना तसेच तालुक्यातील जनतेला पडला आहे.

मतदान संघातील राजकीय नेत्यांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे तसेच साईबाबा संस्थानच्या अधिकार्‍यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे रुग्णालय प्रशासन हतबल होवून कामकाज करत आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. करोनाबाधीत रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसाठी लागणारी औषधांची चिठ्ठी विना सहीशिक्का कोण लिहून देतात ही पण मोठी शंका असून यातूनच काळाबाजार होतो की काय? साईबाबा संस्थानने आवाहन केल्यानंतर देणगीदार भक्तीभावाने दान करतात, अशाच पद्धतीने एखाद्या औषध कंपनीला संस्थानने आवाहन का करू नये?

- सचिन चौगुले, शहराध्यक्ष शिर्डी काँग्रेस कमिटी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com