
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड तालुक्यातील गिरवली शिवारातुन शेतकर्याचे चाळीस हजार रुपये किंमतीचे उसाचे शेतातील ठिबक सिंचनचे पाईप चोरीला गेले होते. जामखेड पोलीसांनी यंत्रणा फिरवत अवघ्या चोवीस तासात दोघांना करमळा तसेच आष्टी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रईस आमिन सय्यद (रा.खङकत, ता.आष्टी, जि.बीड) व दत्ता रुद्रा काकडे (रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापुर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
गिरवली येथील शेतकर्याने चोरी प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तपास चालू असताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत एका संशयितांची माहीती मिळाली.
त्यानुसार त्यांनी पोलीस पथकास रवाना करुन सापळा रचुन संशयित सय्यद यास आष्टी येथून ताब्यात घेतले. त्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केलेले शेतातील ठिबकचे पाईप हे संशयित काकडे यास विकल्याची माहीती दिली. त्यानुसार काकडे याला करमळा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ठिबकचे पाईप हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, अजय साठे , पोलिस नाईक संग्राम जाधव, पोलिस हवालदार अरूण पवार, पोनाईक संदिप आजबे, संदिप राउत यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अजय साठे हे करीत आहेत.