ओढ्या नाल्यावरील अतिक्रमणावर निर्बंध कधी येणार?

शेवटी हवामान बदलाने दारावर दस्तक! पर्जन्यवृष्टीच्या वर्तनात बदल
ओढ्या नाल्यावरील अतिक्रमणावर निर्बंध कधी येणार?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

चालू शतकात जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल याची फक्त ऐकीव माहिती होती. आपला त्याच्याशी काहीच संबंध नाही. त्यामुळे आपण त्याबद्दल फार हवालदिल व्हावयाचे काहीच कारण नाही, हा जो भ्रमाचा भोपळा होता तो आता फुटला असल्याची प्रचिती येऊ लागली आहे. सध्या पर्जन्यवृष्टीच्या वर्तनातील बदल तीव्रतेने जाणवला जात आहे.

भविष्यातील संक्रमणकाळात काही वर्षे यात वाढच होत जाणार आहे. एक आठवड्याच्या आतबाहेर शिर्डी परीसरात जवळपास दहा इंच (250 मिमी) पाऊस पडतोय आणि तो सुध्दा काही तासांच्या मर्यादित वेळेत, ही खर्‍या अर्थाने बदलत्या मान्सुनची फक्त एक झलक आहे. अशीच स्थिती अनेक ठिकाणी घडली आहे. ही घटना केवळ अपवाद आहे, असे नव्हे तर याची तिव्रता भविष्यात वाढती राहणार आहे. जगातील 195 देश सदस्य असलेल्या आयपीसीसी या युनो संलग्न मंडळाने 234 तज्ञांनी सहावा मूल्यमापन अहवाल सन 2022 मध्ये जाहीर केला आहे. त्यात भारतीय उपखंडातील मान्सून प्रभावित देशातील हवामान बदल, मान्सून आणि पर्जन्यमान यातील बदलांवर मागील दीर्घकालीन निरीक्षणावर आधारित महत्त्वाचे भाष्य केले आहे.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे पुढील काळात पर्जन्यमानात वाढ होणार आहे. फक्त पावसाळाच नव्हे तर वर्षभरात अवकाळी पावसाचे दर्शन होत राहील. नियमित मान्सूनच्या पावसापेक्षा अवकाळी पावसाचे प्रमाण वाढणार आहे. यापूर्वीच्या दीर्घ काळात ज्या दिशेने वार्‍याचे पट्टे स्थिर झालेले आहेत. त्यात बदल होऊन नवीन दिशेत हे पट्टे स्थिर होण्याचे संक्रमण सध्या चालू आहे. त्यामुळे जास्त पाऊस पडणार्‍या भागात कमी पाऊस आणि कमी पावसाच्या म्हणजे राजस्थानसारख्या वाळवंटी भागात महापूर अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

या टोकाच्या विषम परिस्थितीमुळे एखाद्या भागात एकाच वेळी अतिवृष्टी आणि अवर्षण यांचे प्रमाण वाढते राहील. एक दोन तासांत ढगफुटी सारखा धुव्वाधार पाऊस आणि नंतर कडाक्याचे ऊन अशी परिस्थिती वारंवार असेल. चक्रीय वादळांची संख्या जास्त वाढणार आहे. कमी वेळेत विक्रमी पाऊस पडल्याने पूरस्थिती उद्भवून जिवीतहानी तसेच शेती, पिके घरेदारे, रस्ते इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान भविष्यातही वाढतेच राहणार आहे. अतिवृष्टीमुळे आर्द्रतामान वाढून नवीन रोगजंतू, जीवजंतू निर्मितीला पोषक वातावरण मिळेल.

येत्या काळात बदलास सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. मात्र त्याबाबत वरपासून खालपर्यंत अपेक्षित असलेले गांभीर्य दिसून येत नाही. तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे कुणी दूरदृष्टी दाखवत नाही. नैसर्गिक नद्या ओढेनाले यावर अतिक्रमण करण्याची सार्वत्रिक चढाओढ चालू आहे. सरकार दरबारी त्याबाबत अळीमिळी गुपचिळी दिसून येते. संबंधितास वरदहस्त असेल तर प्रशासन तिकडे डोळेझाक करते. त्याचा परिणाम म्हणून आपण महापूर निर्मितीला स्वतःहून हातभार लावत आहोत आणि त्याचे भोग अन्य निरपराधांना भोगायची वेळ येते. प्रशासनाबरोबर हातमिळवणी करून व्यक्तीगत स्वार्थासाठी इतरांचे जीवन तसेच मालमत्तेच्या नुकसानीला आपण कारण ठरत आहोत.

आजमितीला नदी, ओढेनाले लगत ज्यांचे क्षेत्र आहे, त्यांनी ओढ्या नाल्यावर कब्जा करून पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण केले आहेत, असे सार्वत्रिक चित्र आहे. शंभर फूट रुंदीचे ओढे दहा फुटावर आणले आहेत. यापूर्वी पडणारा पाऊस हंगामभर विखुरलेला असे. पण आता पुढील काळात काही तासांत धुव्वाधार वृष्टी होण्याचे प्रमाण जास्त राहणार असल्याने वारंवार पूरस्थिती निर्माण होईल. त्यामुळे नदी तसेच लहान मोठ्या ओढ्या नाल्यांवरील अतिक्रमणे हटविणेसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम हाती घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर पूरस्थितीमुळे होणार्‍या नुकसानीची भरपाई देण्यातच सरकारी महसूल खर्ची पडत राहील. सभोवतालच्या घटनांची तिव्रता आणि वाढती संख्या बघून याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी अग्रक्रम देणे, ही काळाची गरज आहे.

आयपीसीसी मूल्यमापन अहवाल क्रमांक 6 मधील उपस्थित केलेल्या मुद्यांची शासन स्तरावरून गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. केवळ समिती नेमणे वा बैठकीत विषय चर्चेला घेत राहणे, याऐवजी क्षेत्रीय पातळीवर त्याची कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे. बदलत्या हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी सर्वसामावेशक पक्षातीत आणि श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन काम झाले आणि त्या अनुषंगाने जनजागृती झाली तरच काहीतरी चांगले निष्पन्न होईल. अन्यथा दरवेळी तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेली तर ती सर्वांचीच फसवणूक ठरेल.

- उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com